16 December 2017

News Flash

कंगनासोबतच्या नात्यावर अखेर हृतिक बोलला

मी उलट स्वतःलाच याहून अधिक वाईट घटना घडू नये म्हणून वाचवत आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 5:34 PM

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये सुरु असलेला वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही असंच म्हणावं लागेल. प्रेमाच्या नात्याने सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासाला आता एक वादग्रस्त वळण मिळालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सर्व प्रकरणाबद्दल शांत असलेल्या हृतिकने आता आपले मौन सोडले आहे. पहिल्यांदा तो या प्रकरणावर खुलेपणाने बोलला.

हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दोन पानी पत्र लिहिलं आहे. या पत्रात तो म्हणतो की, ‘मी नेहमी क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि सतत काम करण्याला प्राधान्य देतो. या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतात त्यापासून मी दूर राहणेच पसंत करतो. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर मत प्रदर्शन करण्यापेक्षा त्या गोष्टींपासून मी दूर राहणे आणि त्या गोष्टीला आयुष्यात महत्त्व न देणे अधिक महत्त्वाचे समजतो. पण कधी कधी दुर्लक्ष केलेला आजार नंतर पुढे जाऊन बळावतो त्याचप्रमाणे या प्रकरणाकडे मी दुर्लक्ष केले आणि आता हा विषय फार मोठा झाला आहे. शिवाय प्रसारमाध्यमांना हा विषय सोडूनही द्यायचा नाही असेच आतापर्यंत दिसून आले आहे.’

‘ज्या प्रकरणात माझा काहीही सहभाग नाही अशा प्रकरणात मला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची गरज वाटत नाही. मला या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आले आहे. आज खरे काय आहे ते मी सांगणार आहे.’

‘खरे हे आहे की, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात त्या महिलेला एकांतात कधीही भेटलो नाही. हो मला मान्य आहे की आम्ही एकत्र काम केले. पण खासगीत फक्त दोघंच असे कधीही भेटलो नाही आणि हेच सत्य आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी हे सारे करत नाही किंवा मी किती चांगला मुलगा आहे हेही मला सिद्ध करायचे नाही. मी शेवटी एक माणूस आहे आणि मला माझ्या चुकांची पूर्ण जाणीव आहे. मी उलट स्वतःलाच याहून अधिक वाईट घटना घडू नये म्हणून वाचवत आहे.’

‘या सर्व प्रकरणात फार कमी प्रसारमाध्यमं अशी आहेत ज्यांना सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. या सर्व गोष्टींनी मला धडा शिकवला आहे. एका माणसाकडून एका मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे ही खोटी बाजू जर लोकांना खरी वाटत असेल तर मला याबाबतही काही बोलायचे नाही. मला कोणत्याच गोष्टींवर आक्षेप घ्यायचा नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांवर अगणित अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या या अत्याचारांविरोधात पुरूषांना जास्तीत जास्त शिक्षाही झालीच पाहिजे. पण म्हणून एखादी मुलगी खोटं बोलू शकत नाही असाच जर लोकांचा विश्वास असेल तर मला त्याबद्दलही काही बोलणे नाही. मला तेही मान्य आहे.

या संपूर्ण प्रकरणात एकही पुरावा, फोटो, सेल्फी किंवा प्रसारमाध्यमांनी पाहिल्याचे वृत्त समोर आलेले नाही. कोणत्या प्रत्यक्षदर्शीनेही कधीही एकत्र पाहिले नाही. या प्रकरणात त्या मुलीची बाजू सिद्ध होईल असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाही, पण मुलगी खोटे बोलू शकत नाही असा विश्वास असणाऱ्यांना जर तिचीच बाजू खरी वाटत असेल तर मला तेही मान्य आहे. माझ्या पासपोर्टमध्येही मी जानेवारी २०१४ मध्ये कुठेही बाहेर गेलो नसल्याचे स्पष्ट होते. या सर्व प्रकरणात फक्त एकच फोटो मीडियाकडे आहे जो फोटोशॉप केलेला आहे.’ या आणि अशा अनेक गोष्टींवर हृतिकने त्याच्या चार पानी पत्रातून भाष्य केले आहे.

First Published on October 5, 2017 5:34 pm

Web Title: hrithik roshan speaks up for the first time on kangana ranaut