भारतीय सुपरहिरो क्रिश सिरिजमधल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, मात्र काही कारणामुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त सापडत नव्हता. अखेर हा चित्रपट २०२० पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं राकेश रोशन यांनी सांगितलं आहे.

२००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा ‘क्रिश ४’ चौथा भाग असणार आहे. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन पुढच्या भागांत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनुक्रमे २००६ आणि २०१३ मध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘क्रिश ४’ येणार असल्याचाही मानस निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांनी बोलून दाखवला. मात्र पाच वर्षे उलटले तरी ‘क्रिश ४’ अजूनही पडद्यावर आला नाही.

हृतिकचं आजारपण आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या इतरही अडचणींमुळे हा चित्रपट लांबणीवर गेला. मात्र २०२० पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं आश्वासन रोशन यांनी चाहत्यांना दिलं. विशेषत: बच्चे कंपनीमध्ये क्रिश सुपरहिरो सर्वाधिक प्रसिद्ध झाला होता त्यामुळे क्रिश ४ विषयी छोट्या चाहत्यांमध्येही बरंच कुतूहल आहे.  सध्या हृतिक ‘सुपर ३०’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यानंतर टायगर श्राफ सोबतही त्याचा एक चित्रपट येणार आहे. या दोन्ही चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर हृतिक २०१९ मध्ये ‘क्रिश ४’ च्या चित्रीकरणाला सुरूवात करेन आणि २०२० पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती रोशन यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना दिली.