करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच काही ज्येष्ठ नागरिकही आहेत, ज्यांना या लॉकडाउनचा फटका सहन करावा लागतोय. आतापर्यंत समाजातील अशा गरजूंसाठी आणि करोनाग्रस्तांसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोणी आर्थिक मदत केली आहे. तर कोणी अन्नधान्य पुरवलं आहे. यामध्येच आता अभिनेता हृतिक रोशनही मदतीसाठी धावून आला आहे. एका एनजीओच्या माध्यमातून तो गरजूंना मदत करणार आहे.

सध्या देशावर जी परिस्थिती ओढावली आहे. त्यात अनेकांची उपासमार होताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांना पौष्टीक जेवण मिळावं म्हणून हृतिकने एका एनजीओसोबत हातमिळवणी केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो १.२ लाख लोकांना तयार जेवण पुरवणार आहे. एनजीओने ट्विटरवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. समाजातील गरजू कामगार आणि वृद्धांना या एनजीओच्या माध्यमातून तयार जेवण पुरवलं जाणार असून हृतिकने या मदतकार्यात मदतीचा हात पुढे केल्याचं त्यांनी सांगितलं.


‘आता आमच्या एनजीओसोबत सुपरस्टार हृतिक रोशनचं नाव जोडलं गेलंय हे सांगताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आता हृतिकच्या मदतीने आम्ही वृद्धाश्रम, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि देशभरात दारिद्ररेषेखाली असलेल्या नागरिकांसाठी पौष्टीक जेवण पुरवणार आहोत. जोपर्यंत देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत आम्ही ही मदत करु’, असं एनजीओने ट्विट केलं.

एनजीओच्या या ट्विला हृतिकनेही उत्तर दिलं आहे. ‘आपल्या देशात कोणीही उपाशी झोपू नये यासाठी आपण प्रयत्न करु. तुम्ही सगळे खरे सुपरहिरो आहात’, असा रिप्लाय हृतिकने दिला.

दरम्यान, हृतिकने मदतीसाठी हात पुढे केलेले एनजीओ समाजील गरजू, रोजंदारीवर काम करणारे कामगार, बेघर लोक यांना मदत करते. ही एनजीओ समाजातील दुर्बल घटकांना जेवण पुरवते.