अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स पाठवले आहेत. मुंबई पोलिसांनी हृतिकला २७ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर (सीआययू) हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात ही चौकशी केली जाणार आहे. कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगत त्याच्यावर काही गंभीर आरोप केले होते. याच आरोपींची चाचपणी करण्यासाठी आता हृतिकची चौकशी होणार आहे.

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचं अफेयर आणि ब्रेक अप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली होती. त्यानंतर या दोघांमधील वाद प्रसारमाध्यमांमधूनच चांगलेच रंगवले गेले. कंगनाने अनेकदा हृतिकला या वादांवरुन सुनावले आहे. या प्रकरणामध्ये मागील अनेक काळापासून हे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अखेर या प्रकरणामध्ये आता पहिल्यांदाच पोलिसांनी हृतिकला चौकशीसाठी बोलवलं आहे.

 

ह्रतिकच्या तक्रारीचा कंगनाशी काय संबंध?

२०१६ मध्ये ह्रतिक रोशनने कंगनासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. ह्रतिक आणि कंगनाने २०१३ मध्ये ‘क्रिश’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना कंगनाने ह्रतिकचा उल्लेख ‘Silly Ex’ असा केला होता. यानंतर ह्रतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवली.

सर्वात आधी ह्रतिकने ट्विटरला आपल्यात आणि कंगनामध्ये कोणतेही प्रेमसंबंध नव्हते असा खुलासा केला. यानंतर त्याने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि सार्वजनिकपणे माफी मागण्याची मागणी केली. कंगनाने माफी मागण्यास नकार दिला. तसंच २०१४ मध्ये आमच्या प्रेमसंबंध होते असा दावा केला. कंगनाने ह्रतिकला नोटीस पाठवली आणि आपण पाठवलेली नोटीस मागे घे किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जा असा इशारा दिला.

ह्रतिकने तोतयागिरी झाल्याची तक्रार दाखल का केली?

ह्रतिक रोशनच्या कायदेशीर नोटीशीत कंगना राणौतकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कंगनाने आपल्याला १४३९ ईमेल पाठवले, ज्यांना आपण उत्तर दिलं नाही. तसंच इंडस्ट्रीतील लोकांना ती आमच्यात संबंध होते असं सांगत असल्याचा दावा ह्रतिककडून करण्यात आला. कोणीतरी ह्रतिकच्या नावे कंगनाशी संवाद साधत असावं अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

कंगनाने मात्र आपण ज्या ईमेल आयडीशी संपर्कात होतो तो त्याने स्वत: दिलं असल्याचा दावा केला. पत्नी सुझानसोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु असून त्याच्यावर कोणताही नकारात्मक परिणा होऊ नये यासाठी तो ईमेल आयडी प्रायव्हेट ठेवण्यात आला होता असंही ती म्हणाली होती. यानंतरही कंगना आणि ह्रतिकमध्ये ट्विटरच्या माध्यमातून शाब्दिक युद्ध रंगलं होतं. ह्रतिकने कंगना कल्पना करत असून एस्पर्गर सिंड्रोमचा सामना करत असल्याचंही बोलून टाकलं. पण यामुळे ह्रतिकला मोठ्या प्रमाणता टीकेला सामोरं जावं लागलं. एस्पर्गर सिंड्रोमचा सामना करणाऱ्या मुलांच्या पालकांनी ह्रतिकच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

अखेर ह्रतिकने आपल्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना राणौतशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मेल आयडी अमेरिका स्थित असल्याचं समोर आलं. २०१७ मध्ये पोलिसांनी NIL रिपोर्ट फाईल केला.

कंगना संतापली होती…

हे प्रकरण सायबर सेलकडून  सीआययूकडे वर्ग करण्याच्या निर्णयानंतर कंगना चांगलीच संतापली होती. तिने हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर हृतिकला टॅग करत, “एका छोट्याश्या अफेयरसाठी किती काळ रडणार?”, असा प्रश्न विचारला होता. “आता ऋतिक रोशनच्या विचित्र गोष्टी पुन्हा सुरू झाल्या आहेत. आमचं ब्रेक अप झाला, त्यानंतर त्याचा घटस्फोटही झाला. तरी इतक्या वर्षांनीही तो त्याच गोष्टी धरुन बसला आहे. तो या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करण्यासही नकार देतो. जेव्हा मी माझ्या व्यक्तीगत आयुष्यात थोडं धैर्य गोळा करण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा याची नाटकं पुन्हा सुरु होतात. अरे ऋतिक एका छोट्याश्या अफेयरसाठी किती गळा काढशील?” या आशयाचं ट्विट करत कंगनाने हे प्रकरण क्राइम इंटेलिजन्स युनिट वर्ग करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हृतिकला सुनावलं होतं.