हल्ली सायबर क्राइमचे वाढते प्रमाण टाळण्यासाठी इंटरनेटवरील प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणाही नजर ठेवून आहेत. पण असे असूनही अनेकजण सायबर क्राइमचे शिकार होत आहेत. त्यातच आता अभिनेता हृतिक रोशनची भर पडली आहे. नुकतेच हृतिकचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. थट्टामस्करीमध्ये कोणीतरी त्याचे अकाऊंट हॅक करुन त्यावर ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ सुरु केले. ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ सुरु होताच त्यावर जवळपास ५०० लोक जोडले गेले. हे स्ट्रिमिंग सुरु असतानाच काही वेळाने इतरांच्या लक्षात आले की, हा अभिनेता हृतिक रोशन नसून कोणी एक तोतया आहे.
हृतिकचे ‘एफबी’ अकाऊंट हॅक करुन त्यावरील प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला होता. त्यानंतर ही बाब लक्षात येताच हृतिकने त्याच्या पेजवरुन याबाबतची माहिती दिली. अकाऊंट हॅक झाल्याच्या बातमीला दुजोरा देत हृतिकने हे प्रकरण मिटले असल्याचे ही सांगितले.
पण या सायबर क्राइममध्ये हृतिकने त्याचे अकाऊंट हॅक करणाऱ्याची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशनपूर्वी शाहिद कपूर, इरफान खान या कलाकारांचेही अकाऊंट हॅक झाले होते. कलाकारांची वाढती लोकप्रियता आणि सोशल मीडियावर त्यांची वाढती सक्रियता पाहता सायबर क्राइम सारख्या घटना घडणं धोकादायक ठरत आहे. कलाकार आणि त्यांचे खासगी आयुष्य याबाबत अनेकांना नेहमीच कुतूहल असते, पण काही चाहते मात्र ठराविक पातळी ओलांडत चुकीचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे यावर कुठेतरी आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.  दरम्यान काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणारा ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, अभिनेता अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटाला टक्कर देणारा हृतिकचा हा चित्रपट फारसा गाजला नाही.