बॉलीवूडमधील बहुचर्चित असे ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन चित्रपट या आठवड्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाले. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने अवैधरित्या दारुचा धंदा करणाऱ्या एका गुंडाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, शाहरुखचा अभिनय या महत्त्वाच्या घटकांमुळे ‘रईस’ खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरही आपली श्रीमंती सादर करण्यात यशस्वी ठरत असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपट शाहरुखच्या चित्रपटाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या जोडप्याच्या आयुष्यात अचानक वादळ येते आणि या जोडप्याचे जगचं उध्वस्त करून जाते. येथून सुरू होते, एका सूडाची कहानी. हृतिक रोशने ‘काबिल’मध्ये साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.

आठवड्याच्या मध्यावरच शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिकचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांमध्ये ‘काबिल’ची जास्त प्रशंसा केली गेली असली तरी चार दिवसांच्या कमाईचा आकडा पाहता बॉक्स ऑफिसवर शाहरुखच वरचढ असल्याचे चित्र आहे. ‘काबिल’च्या तुलनेत ‘रईस’ या चित्रपटाच्या कमाईची चांगलीच सुरुवात झालेली पाहायला मिळाली . प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘रईस’ आणि ‘काबिल’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा आकडा ट्विट केला आहे. ‘रईस’ने चार दिवसांत ७५ कोटींचा गल्ला जमविला असून आता १०० कोटी क्लबकडे चित्रपटाने वाटचाल सुरु केली आहे. ‘रईस’ने पहिल्या दिवशी २०.४२ कोटी, दुस-या दिवशी २६.३० कोटी, तर तिस-या दिवशी १३.११ कोटी, तर काल चौथ्या दिवशी १५.६१ कोटींचा कमाई केली आहे. तर ‘रईस’च्या तुलनेत ‘काबिल’ बराच मागे आहे. ‘काबिल’ने पहिल्या दिवशी १०.४३ कोटी, दुस-या दिवशी १८.६७ कोटी, तर तिस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ९.७७ कोटींची कमाई केली. तीन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३८.८७ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. मात्र, ‘काबिल’चा चौथ्या दिवसाच्या कमाईचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

‘परझानिया’सारखा चित्रपट देणारा दिग्दर्शक राहुल ढोलकिया जेव्हा गुजरातमधल्या अवैध दारूचा धंदा करणाऱ्या आणि आपलं साम्राज्य उभारणाऱ्या कोणा एका अब्दुल लतिफ नावाच्या माफियाची कथा सांगतो आहे म्हटल्यावर त्यात नक्कीच काहीतरी वेगळं असणार ही सर्वसामान्य अपेक्षा असते. आणि हा चित्रपट त्या अपेक्षेवर खराही उतरतो. हा चित्रपट लतिफच्या आयुष्यावर नाही असा दावा चित्रपटकर्त्यांनी केला असला तरी ‘रईस’ नावाने समोर येणारी कथा त्याच्या बाबतीत घडलेल्या घटनांचाच मागोवा घेताना दिसते. एका अर्थाने ‘रईस’ ही वृत्ती म्हणून चित्रपटातून समोर येते.

दरम्यान, ‘रईस’च्या तोडीने मैदानात उतरलेला हृतिक रोशन आपल्या सगळ्या कलागुणांनी प्रेक्षकांना आपण ‘काबिल’ आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र चित्रपटात कथेला फारसा वावच नसल्याने एकटय़ा हृतिकच्या काबिलियतवर चित्रपटाची नैय्या पार लागली आहे. एरव्ही अ‍ॅक्शनपटांमध्ये माहिर असलेले दिग्दर्शक संजय गुप्ता या चित्रपटासाठी फारच कमी पडले आहेत. चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ही हास्यास्पद असल्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट एखाद्या सेटवर घडवून आणला जात असल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.