बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यात सुरु असलेल्या वादाने आता नवे रुप घेतले आहे. त्यांच्यातल्या तथाकथित प्रेमप्रकरणावरुन सुरु झालेला वाद नंतर एवढा वाढला की दोघांनीही हा वाद कोर्टापर्यंत नेला. पण ताज्या बातमीनुसार, कंगना आणि हृतिक यांच्यातील हा वाद आता संपण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या मते, हृतिकच्या ई-मेल आयडीवरुन कंगनाला नेकमे कुणी मेल पाठवले होते, याचा उलगडा फॉरेन्सिक तपासणीतूनही झालेला नाही. त्यामुळेच आता पोलिसांनी या प्रकरणाची फाइल कायमची बंद करण्याच्या विचारात आहे.

हे मेल अमेरिकेमधून करण्यात येत होते. पण याचे सर्व्हर मुळात अमेरिकेत असल्यामुळे या शोधामध्ये अडथळे येत होते. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.

हृतिकने मला अनेक ईमेल पाठवले होते, असा कंगनाचा दावा आहे. हृतिक मात्र हे मानायला तयार नाही. माझ्या नावाने कंगनाशी बोलणारा दुसराच कुणीतरी असल्याचे त्याने वारंवार सांगितले आहे. शेवटी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हृतिकने मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता.याविरुद्ध त्याने तक्रारही दाखल केली होती. कुणीतरी अज्ञात व्यक्ती hroshan@email.com या आयडीचा वापर करुन मेल करत आहे असे त्याने या तक्रारीत म्हटले आहे. ५ मार्च २०१६ रोजी हृतिकने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली होती.

नेमके हे प्रकरण आहे तरी काय?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते. यानंतर हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली होती. यानंतर दोघेही एकमेकांवर सार्वजनिक कार्यक्रमात बेछूट आरोप करत सुटले होते.

कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते असा आरोप हृतिकने कंगनावर केला होता तर ती एक मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे कंगनानेही हृतिकवर असेच काहीसे आरोप केले होते.