बॉलिवूडमधील दोन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एकत्र आले की तो चित्रपट विशेष गाजतो यात काही शंकाच नाही. काही महिन्यांपूर्वीच फराह खान व रोहित शेट्टी एकत्र येणार अशी घोषणा केली होती. ते दोघे मिळून अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक करणार आहे. आता या चित्रपटात अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तानुसार ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर हृतिकसह कोणती अभिनेत्री दिसणार या चर्चा रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. हृतिकसह अभिनेत्री दीपिका पादूकोण दिसणार असल्याचे पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

दीपिका आणि हृतिकने यापूर्वी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु तशी संधी त्यांना मिळाली नव्हती. पण आता दीपिका आणि हृतिक ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. फराह आणि रोहितच्या मते दीपिका आणि हृतिक या भूमिकेसाठी एकदम योग्य कलाकार आहेत. दरम्यान दीपिकाला चित्रपटाची कथा आवडली असल्याचे देखील म्हटले आहे.

राज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते. सात भावंडांभोवती ही विनोदी कथा फिरते. ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार ही कथा आधुनिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न फराह खान करणार आहे. “फराहने ही कल्पना हृतिकला सांगितली असून, हृतिकनेही यासाठी होकार कळवला आहे. फराहने या स्क्रिप्टवर काम केले असून आजच्या काळाशी सुसंगत लिखाण केले आहे. फराह व हृतिक यांची जुनी मैत्री असल्यामुळे हृतिकने कथा ऐकताच होकार कळवला. इतर गोष्टी नक्की झाल्यानंतर हृतिकही याची अधिकृत घोषणा करेल” असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करणार आहे. रोहितलाही हृतिकबरोबर काम करण्याची खूप उत्सुकता आहे.

शाहरुख खान, अक्षय कुमार यांची नावे चर्चेत असताना या टीमने ह्रतिकला एका कारणासाठी निश्चित केले आहे. “या भूमिकेसाठी अशा एका अभिनेत्याची गरज होती जो चाळिशीतला दिसेल. अगदीच लहान किंवा अगदीच मोठा अभिनेता या भूमिकेसाठी योग्य नव्हता. ‘सत्ते पे सत्ता’च्या प्रदशनाच्या वेळी अमिताभ बच्चन यांचे वयही चाळीसच होते.” असे सूत्रांनी सांगितले.