सलमान खानचा आगामी ‘दबंग ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यामध्ये काही साधू सलमानसोबत नाचत असल्याचं म्हणत अनेकांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या एकाच गोष्टीची चर्चा रंगत आहे. परंतु आता या साऱ्यावर गाण्याची नृत्यदिग्दर्शिका शबीना खानने मौन सोडलं आहे.

‘हुड हुड दबंग’ या गाण्यामध्ये सलमानसोबत काही साधू नृत्य करत असल्याचं सांगत हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या आक्षेपानंतर सोशल मीडियावरही ‘दबंग ३’ चित्रपटाविरोधात ‘#BoycottDabangg3’ हा हॅशटॅग व्हायरल झाला. मात्र साऱ्यावर नृत्यदिग्दर्शिका शबीनाने तिचं मत व्यक्त करत, ‘प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करत बसलात तर चित्रपटांची निर्मिती करायची कशी?’, असा सवालही विचारला.

“प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये सलमानसोबत जे साधू दिसत आहेत. ते प्रत्यक्षात खरे साधू नाहीयेत. केवळ साधूंसारखा वेश करुन नृत्य करणारे कलाकार आहेत. साधूंच्या वेशामध्ये दिसणारे, डान्स करणारे ही कलाकार मंडळी आहेत. या गाण्याचं चित्रीकरण मध्य प्रदेशमधील महेश्वर येथे चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याचं चित्रीकरण होत असताना तेथे चित्रीकरण पाहण्यासाठी काही साधू आले होते. मात्र ते बाजूला उभे होते”, असं शबीनाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “या गाण्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. यापूर्वीदेखील अनेक चित्रपटांमध्ये साधूंच्या वेशामध्ये कलाकार झळकले आहेत. मनोज कुमार यांची भूमिका असलेल्या ‘संन्यासी’ या चित्रपटामध्ये ‘चल संन्यासी मंदिर में’ या गाण्यात हेमा मालिनी साधूंना त्रास देताना दिसून आल्या होत्या. त्याचप्रमाणे मुमताज यांनीही राजेश खन्ना यांच्यासोबत ‘गोरे रंग पे’ या गाण्यात साधूंचा वेश करुन नृत्य केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं नाही की हुड हुड दबंग गाण्यातील नृत्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे. जर लोकं अशा लहान-सहान गोष्टींचं निरीक्षण करायला लागले तर आम्ही चित्रपट कसे बनवायचे?

दरम्यान, ‘दबंग ३’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाविषयी रोज नवीन वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला तिसरा चित्रपट असून याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.