बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी चौकशी सुरु आहे. मंगळवारी ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीला अटक केली. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी कट रचून सुशांतची हत्या करण्यात आली असा दावा केला आहे.

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी काही ट्विट केले आहेत. ‘एसएसआर (सुशांत सिंह राजपूत)चे भक्त विचारतायेत की या खटल्याचा निकाल कधी लागणार. मी नाही सांगू शकत पण तपास करण्यासाठी सुशांतचा मृतदेहच उपलब्ध नसल्याने एआयआयएम्सच्या टीमला स्वतंत्रपणे तपास करता आला नाही. त्यामुळे हॉस्पिटलने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून ते म्हणाले हत्येची शक्यता नकारता येणार नाही. पण सीबीआय परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपला निर्णय घेऊ शकते’ या आशयाचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

त्यांनी पुढे ‘आता त्रिमूर्ती एजन्सींनी (सीबीआय, ईडी आणि एनसीबी) मोठे पुरावे शोधून काढले आहेत, ज्यावरून मला विश्वास आहे की सीबीआयला कोर्टात हे सिद्ध करणे सोपे जाईल की ही कट रचून हत्या करण्यात आली होती. याने केवळ न्याय मिळणार नाही तर त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल’ या आशयाचे दुसरे ट्विट केले आहे.