‘अँग्री यंग मॅन’ लुक, अनोखी शक्ती आणि उत्कृष्ट अभिनय शैलीच्या जोरावर ‘वूल्वरीन’ने शेकडो सुपरहिरोंच्या गर्दीत सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, स्पायडरमॅन या आघाडीच्या सुपरहिरोंप्रमाणेच स्वत:ची अशी एक नवीन ओळख निर्माण केली आहे. या ‘म्युटंट’ सुपरहिरोला ‘वूल्वरीन’व्यतिरिक्त ‘लोगन’ व ‘एक्स मॅन’ या नावांनीही ओळखले जाते. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता ह्य़ु जॅकमनच्या अभिनय कारकीर्दीतील ही सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. किंबहुना, आज सिनेसृष्टीत त्याला ‘लोगन’ या नावानेही ओळखले जाते. मात्र त्याने या व्यक्तिरेखेला आता पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

ह्य़ु जॅकमन यापुढे ‘वूल्वरीन’ ही व्यक्तिरेखा मोठय़ा पडद्यावर साकारणार नाही. त्याच्या या निर्णयाने साहजिकच त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहेत.कॉमिक्स व कार्टून मालिकेतून झळकलेला लोगन २००० साली ‘एक्स मॅन’ या चित्रपटातून पहिल्यांदा मोठय़ा पडद्यावर अवतरला. या चित्रपटाला तिकीट बारीवर फार मोठी कमाल करता आली नाही. परंतु त्यातील वूल्वरीन या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जॅकमन त्या भूमिकेत इतका चपखल बसला की जणू त्या व्यक्तिरेखेचा जन्म त्याच्यासाठीच झाला असावा. पुढे ‘एक्समॅन’ या चित्रपट मालिकेतून त्याने तब्बल १७ वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले, परंतु आता या दीर्घ प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिकेचे दिग्दर्शक जो रुसो ‘लोगन’ला एका नवीन अवतारात आणण्याच्या प्रयत्नात होते. परंतु जॅकमनच्या या निर्णयामुळे ते देखील नाराज झाले आहेत. तरीही त्यांनी त्याचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जॅकमन मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्याच्या मते वयाच्या ४९ व्या वर्षी तो वुल्वरिनच्या भूमिकेला न्याय देऊ शक णार नाही. त्यामुळे एका वृद्ध कलाकारावर गुंतवणूक करण्यापेक्षा माव्‍‌र्हलने एखाद्या तरुण कलाकाराला संधी द्यावी, अशी विनंती त्याने केली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक कधीच कुठली गोष्ट अर्धवट सोडत नाहीत. त्या न्यायाने जॅकमनचा हा निर्णय त्याच्या देशवासीयांनाही आवडलेला नाही. ‘माव्‍‌र्हल’नेही ‘वूल्वरीन’ला पर्याय म्हणून ‘डेडपूल’ या व्यक्तिरेखेची निर्मिती केली, परंतु चाहते वूल्वरीनचीच मागणी करत असल्यामुळे निर्मातेही आता गोंधळात पडले आहेत.