एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आज सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने सुटका झाली आहे. रियाच्या सुटकेनंतर अभिनेत्री हुमा कुरेशीने रियाचे समर्थन केले आहे. रिया चक्रवर्तीची माफी मागितली पाहिजे, असे हुमाला वाटते. या प्रकरणात हत्या कारस्थानाचा सिद्धांत मांडणाऱ्या लोकांचाही हुमाने चांगलाच समाचार घेतला.

“रिया चक्रवर्तीची माफी मागितली पाहिजे. हत्या, कारस्थानाचा सिद्धांत मांडणाऱ्याची चौकशी झाली पाहिजे असे हुमाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. तुमच्या अजेंड्यासाठी एका मुलीचं आणि तिचं कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात हुमाने आपला संताप व्यक्त केला आहे.

रियाचा जामीन अर्ज आज मंजूर झाला आणि तिची काही वेळापूर्वीच सुटका झाली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला मात्र जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती आज अखेर महिनाभराने ती तुरुंगातून बाहेर आळी आहे.