रेश्मा राईकवार

राजकीय कोपरखळ्या, चिमटे, एकमेकांना लगावलेले टोले या गोष्टी आपल्याकडे नवीन नाहीत. राजकारण्यांनाही त्याची कल्पना आहे. आपल्याकडे राजकीय विनोदाची ही परंपरा अगदी आचार्य अत्र्यांपासूनची आहे. त्यामुळे राजकारणी व्यक्तींवर विनोद केले तरी ते राग मानत नाहीत, उलट त्यांच्याकडून दाद मिळते, असाच माझा अनुभव आहे. विनोदाकडे विनोद म्हणून पाहण्याची परंपरा राजकारण्यांनीही जपली आहे, अशी भावना अभिनेता, निवेदक डॉ. नीलेश साबळे याने व्यक्त केली.  ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून अनेकदा कलाकार, राजकारणी व्यक्ती, त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना किं वा त्यांचे निर्णय यावर गमतीदार भाष्य केले जाते. जगभर लोकप्रियता मिळवलेल्या या कार्यक्रमाचा कर्ताधर्ता असलेला डॉ. नीलेश साबळे पुन्हा एकदा नवीन शोच्या माध्यमातून टाळेबंदीच्या या काळात लोकांचे मनोरंजन करतो आहे.

‘लाव रे तो व्हिडीओ’ या कार्यक्रमाचे नावच मुळी महाराष्ट्राला परिचित झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानावरून घेतले आहे. मात्र या शोमध्ये तसा राजकारणाचा कुठलाही संदर्भ नाही. ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू झालेल्या या शोमध्ये नीलेश पहिल्यांदाच दुहेरी भूमिके त दिसतो आहे. एक स्वत: नीलेश म्हणून तर दुसरा नीलेशचा भाऊ या दोन्ही भूमिकांमधून तो हा शो पुढे नेतो आहे. टाळेबंदी सुरू असल्यामुळे सगळं ठप्प आहे. अशावेळी या कार्यक्रमाची चांगली संकल्पना ‘झी युवा’ वाहिनीकडून माझ्याकडे आली, असं नीलेश सांगतो. एरव्हीही सध्या घरबसल्या अनेक जण काही ना काही व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप, फे सबुकवर टाकत असतात. आणि त्यातून आपलं छान मनोरंजन होतं. तर असेच लोकांनी काढलेले त्यांचे व्हिडीओ आपण मागवले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. लोकांचे हे व्हिडीओ पाहिल्यावर आम्हाला खऱ्या अर्थाने लक्षात आलं की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे हुशार, बुद्धिमान लोक आहेत. त्यांचे कलागुण दाखवण्याची संधीच त्यांना मिळत नाही, ते या शोने साध्य केलं आहे. आणि मला खरंच विश्वास वाटतो की हा शो पुढे जाऊन आणखी भव्य स्वरूपात लोकांसमोर येईल, अशा शब्दांत नीलेशने या शोचा प्रवास उलगडला.

टाळेबंदीच्या काळात खरंतर सगळ्याच मालिकांचे जुने भाग वाहिन्यांवर दाखवले जात होते. तसेच ‘चला हवा येऊ द्या’चेही जुनेच भाग दाखवण्यात येत होते. मात्र गंमत अशी आहे की टाळेबंदीच्या आधीही हाच कार्यक्रम टीआरपीच्या तक्त्यात पहिल्या क्रमांकावर होता आणि टाळेबंदीतील तीन महिन्यांतही टीआरपीत तो पहिल्याच क्रमांकावर राहिला आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या लोकप्रियतेचे गमक हे त्याच्या विनोदातच आहे, असं नीलेश स्पष्ट करतो. ही विनोदाची ताकद आहे. बाहेर कितीही अवघड परिस्थिती असेल, तुमच्या मनावर कि तीही मोठे संकट असेल तरी विनोदी किस्से, अभिनय तुम्हाला एका क्षणात तुमचा हा ताण विसरायला लावतो. प्रेक्षकांनीही आम्हाला हेच अभिप्राय पाठवले. या शोमुळे करोनाच्या या काळात खूप आधार मिळाल्याचे अनेकांनी कळवले. त्यामुळे आपण नुसता एक विनोदी कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहत असतो, पण लोकांच्या आयुष्यावर त्याचे पडसाद कसे उमटतायेत हे लक्षात येतं तेव्हा आम्हाला आमची जबाबदारी अधिकच वाढल्यासारखी वाटते, असं तो म्हणतो. अर्थात, या कार्यक्रमात केवळ कलाकारांचे विनोदी अभिनय आणि सेलिब्रेटींच्या भेटीगाठी एवढेच महत्त्वाचे नाही, तर मुळात लेखनावर जास्त भर देत असल्याचे नीलेश सांगतो. जोपर्यंत स्किट मनासारखे लिहिले जात नाहीत तोवर तालमी होत नाहीत. लिखाणासाठीच भरपूर वेळ द्यावा लागतो. सेटवर कोण येणार आहे, त्या व्यक्तीला लक्षात घेऊन स्किट लिहिले जाते, विनोद करतानाही खूप विचारपूर्वक तो लिहिला जातो, पंचेसच्या जागा काढल्या जातात. अनेकदा अपेक्षित पंचला प्रेक्षकांमधून हसू उमटले नाही तर लिखाणातच गडबड झाली आहे हे लक्षात येतं. त्यामुळे अभ्यासपूर्वक मनासारखे लिहून झाल्यानंतरच मग त्याच्या तालमीला सुरुवात होत असल्याची माहिती नीलेशने दिली.

सुरुवातीला मोठमोठय़ा व्यक्ती सेटवर येत. त्यांच्यावर विनोद कसा करणार, याचे दडपण यायचे. पण त्यांनाही ते आवडतंय, त्यांच्याक डूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यावर मग हुरूप वाढला. टाळेबंदीत इतर मालिकांप्रमाणेच याही कार्यक्रमाचे चित्रीकरण बंद आहे. यापुढे नव्या नियमांप्रमाणे चित्रीकरण करताना अनेक अडचणी येणार आहेत. मुळात गर्दी नको, हा नियम असल्याने प्रेक्षकांची उपस्थिती, सेलिब्रिटींना सेटवर येता येईल का? असे अनेक प्रश्न समोर आहेत. पण काही दिवसांपुरतं थोडं स्वरूप बदलून पुन्हा चित्रीकरणाची तयारी करत आहोत. लवकरच नव्याने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम घेऊन लोकांसमोर येऊ.

– डॉ. नीलेश साबळे