रेश्मा राईकवार

टाळेबंदीमुळे अनेक कार्यक्रम रद्द; राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा

छोटे-मोठे सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम करणारे कलावंत, वादक, गायक, तंत्रज्ञ यांच्यासह राज्यभरातील लोककलावंत, तमाशातील कलावंतांवर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यातील एखाद-दुसरा कार्यक्रम वगळता अन्य कुठलेही कार्यक्रम झालेले नाहीत. टाळेबंदी असल्याने लग्न, मिरवणुका, जत्रा अशा सगळ्याच सार्वजनिक-रंगमंचीय कार्यक्रमांवरही बंदी आली असल्याने या कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करून गुजराण करणाऱ्या कलावंतांना पुढचे काही महिने कसे काढायचे?, असा यक्षप्रश्न पडला आहे.

मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर होण्याआधी आमचा एक कार्यक्रम झाला होता. त्यानंतर कु ठलाच कार्यक्रम झालेला नाही आणि पुढचे काही महिने सांस्कृतिक किं वा करमणुकीचे कोणतेही कार्यक्रम होण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत मोठमोठे कलावंत, गायक-वादक काही अंशी टिकाव धरू शकतील, मात्र अशा कार्यक्रमांमधून तबल्यावर किं वा अन्य वाद्यांवर साथ देणारी मंडळी, प्रकाश-ध्वनी योजना सांभाळणारे तंत्रज्ञ यांना प्रत्येक कार्यक्रमामागे पैसे मिळत असतात. त्यांना पुढचे काही महिने कार्यक्रमच नसल्याने उत्पन्न कसे मिळणार?, असा सवाल ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर यांनी केला.

राज्यभरात गावागावांतून काही लग्नसराई किंवा जंगी कार्यक्रमांच्या निमित्ताने तमाशा सादर करणारे, लग्नात सनईचौघडा वाजवणारे असे अनेक कलाकार आहेत. ज्यांना प्रत्येक कार्यक्रमामागे दोनशे-तीनशे रुपये  मिळतात. त्यांची खऱ्या अर्थाने उपासमार होते आहे. हातात कोम नाही, त्यामुळे पैसा नाही अशी अवस्था असलेले हे कलाकार आजही असंघटित असल्याने त्यांच्यापर्यंत सरकारी मदतीचा हात पोहोचणेही अवघड आहे, अशी माहिती ‘मराठी बाणा’चे अशोक हांडे यांनी दिली. एरव्ही हे कलावंत सरकारी स्तरावर होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत असतात, मात्र सरकारी योजनेचे लाभार्थी होण्यासाठी त्यांना आपण कलावंत आहोत हे कागदोपत्री सिद्ध करावे लागते. अनेकांकडे असा

कुठलाही कागदोपत्री पुरावा किंवा कलावंत म्हणून नोंदणी नसल्याने त्यांचे प्रश्न सोडवायला कोणीच पुढे येत नाही, असेही हांडे यांनी सांगितले.

मार्च-एप्रिल-मे या महिन्यात होळीपासून गुढीपाडवा, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन असे अनेक सणवार हे कलावंतांसाठी महत्त्वाचे होते. मात्र करोनाचे संकट डोक्यावर असल्याने हे सगळेच सण कोणत्याही कार्यक्रमांविना कलाकारांना सुने सुने करून गेले, अशी माहिती ‘मेघमल्हार’चे स्वप्नील पंडित यांनी दिली. फे ब्रुवारी ते एप्रिलपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांमधून जी मिळकत येते त्यात पुढचे तीन महिने काढले जातात, असे पंडित यांनी सांगितले.  या तीन महिन्यात अनेक कलाकारांचे परदेशात कार्यक्रम होतात, सध्या हे कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे गेले असल्याने आयोजकांचेही आर्थिक गणित कोलमडून पडले आहे, अशी माहिती मंदार कर्णिक यांनी दिली. बँका किंवा कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रायोजकत्व घेऊन कार्यक्रम आम्ही आयोजित करतो, मात्र सध्याच्या परिस्थितीत टाळेबंदी उठली तरीअशाप्रकारे प्रायोजकत्वही मिळणार नसल्याने कार्यक्रमांसाठी निधी उभारायचा कसा हे गणित अवघड झाले आहे, असे कर्णिक यांनी सांगितले.   ‘पंचम निषाद’चे शशी व्यास यांच्या मते मोठमोठे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम एप्रिल-मे महिन्यात होतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, पण नियमितपणे छोटे-छोटे कार्यक्रम सादर करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसेल.

‘कलावंत-तंत्रज्ञांना सहाय्य करावे’

या कलावंतांसाठी एकच एक संस्था नाही. त्यातही ‘लिम्पा’सारख्या संस्थेने इतर काही कलावंत, आयोजक यांना एकत्र करून समिती तयार केली आहे. या समितीच्या वतीने रंगमंचीय कार्यक्रमांवर अवलंबून असलेल्या कलावंत-तंत्रज्ञांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे सरकारला केली आहे.