|| सुहास जोशी

चांगले कलाकार, चांगले तंत्रज्ञ असले तरी एखादं कथानक फसू शकतं. त्या कलाकारांचा अभिनय, तंत्रज्ञांनी उभारेलेले सेट्स, कपडेपट, मेकअप अशा गोष्टींनी वातावरण निर्मिती होते, मात्र कथेत जीव ओतण्याचे काम सांभाळणाऱ्याने हे सारं योग्य प्रकारे हाताळलं नसेल तर गडबड होते. तसं काहीसं ‘हुतात्मा’ या वेबसीरिजचं झालं आहे. खूप काही आहे पण नेमकं काहीच हाताला लागत नाही, अशी या वेबसीरिजची परिस्थिती झाली आहे.

ही वेबसीरिज मीना देशपांडे यांच्या ‘हुतात्मा’ या कादंबरीवर आधारित आहे, असं सुरुवातीच्या टायटल्समधून कळतं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एका कामगार कुटुंबाच्या घरातील कथानक याच्या मध्यवर्ती आहे, पण त्याच्या आजूबाजूने त्या काळातील राजकारण, समाजकारण असं बरंच येत राहतं. अर्थातच हे काल्पनिक कथानक आहे आणि त्याला तत्कालीन सत्य परिस्थितीची जोड दिली आहे. विद्युत सावंत (अंजली पाटील) हिचे कामगार वडील गिरणीतून घरी येताना मोर्चादरम्यान पोलिसांची गोळी लागून मृत्युमुखी पडतात. वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा हे विद्युतच्या मनात सतत घोळत असते. दरम्यानच्या काळात ती समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये रमलेली असते. तिथेच तिला कम्युनिस्टांचे आकर्षण निर्माण होते. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा विचार एकीकडे सतत सुरू असतो, त्या दृष्टीने ती काही यशस्वी, अयशस्वी प्रयत्न देखील करते. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राबाबत सुरू असणारे प्रयत्न, राजकारण हा प्रवासदेखील काही प्रमाणात उलगडत जातो.

कथेचा जीव म्हटलं तर मर्यादित आणि त्याच वेळी खूप मोठय़ा प्रमाणात व्यापक आहे. मूळ कादंबरीत काय लिहिलंय याची तुलना करण्यापेक्षा जे दाखवलं ते पाहिलं तर सीरिजकर्ते एकाच वेळी खूप काही सांगायचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे अनेक पात्रं, संवाद हे केवळ एखादीच घटना स्थापित करायची आहे याच उद्देशाने येत राहतात. तेवढय़ापुरतीच कथेत डोकावणारी ही माणसं अजिबात प्रभाव पाडत नाहीत, पण उगाचच वेगळं काही तरी सांगतोय असा आभास निर्माण करतात. त्यामुळे पाहणाऱ्याला काहीच फायदा होत नाही.

कथा वैयक्तिक असली तरी तिला तत्कालीन राजकारणाचे पदर असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काही थोडा भाग यात डोकावतो. पण तो डोकावताना त्याचा पुरेसा प्रभावच जाणवत नाही. प्र. के. अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, कॉ. डांगे, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण अशा कैक व्यक्तिरेखा यामध्ये आहेत, पण ती पात्रे नेमकी का महत्त्वाची आहेत, हे पडद्यावर जे काही दाखवलं आहे त्यातून अजिबात उलगडत नाही. किंबहुना, ही मालिका अत्रेंच्या स्मृतींना वाहिली आहे असं सुरुवातीस म्हटलं आहे. ते अत्रे कथेत खूप ठिकाणी आहेत, पण त्यांचं असणं कथेची उंची थोडीदेखील वाढवत नाही. त्याच जोडीला आणखीन काही संपादक, लेखक आणि वकिलांची पात्रं यात आहेत. त्यांनी भरपूर फुटेज खाल्लं आहे. कदाचित मूळ कांदबरीत त्याचं वर्णन अधिक खुलवलेलं असावं की काय, पण येथे मालिकेत ही पाच पात्रं कथानकाचा प्रवाहच खुंटीत करताना दिसतात.

खरं तर यामध्ये खच्चून नाटय़ आहे. साठच्या दशकात एक सर्वसामान्य मराठी घरातील मुलगी रॉकेल बॉम्ब, उंदीर मारण्याचे औषध, पिस्तूल यांचा प्रयोग माणसांवर करते हे एकूणच पडद्यावर मांडायला पुरेसे नाटय़ होते. जोडीला संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहेच, पण खूप काही सांगायच्या नादात सीरिज भरकटली आहे.

मालिकेतील सर्वात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे अंजली पाटील हिचा अभिनय. प्रेक्षकांना पडद्यावर टिकवून ठेवण्यात तिचंच श्रेय अधिक आहे. अतिशय संयत पण तितक्याच ताकदीने ती विद्युतची भूमिका वठवते. विद्युतची मानसिकता, त्यात होणारे बदल, त्यातून तिने घेतलेले निर्णय, त्या निर्णयांचा परिणाम असं बरंच काही ती प्रभावीपणे मांडते. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, विक्रम गोखले असे अनेक चांगले कलाकार यात आहेत, पण त्यांचा पुरेसा वापरच करून घेता आलेला नाही.

साठच्या दशकातील वातावरणनिर्मितीसाठी सेटचा वापर उत्तम झाला आहे, पण त्या सेटवर मुख्य कलाकार सोडून वावरणारी माणसं खूपच कृत्रिम पद्धतीने वावरतात. त्यांचे ते जाणीवपूर्वक वावरणं खटकत राहतं. सेट सोडून इतर अनेक ठिकाणं देखील उत्तमरीत्या चित्रित झाली आहेत. मेकअपमध्ये नेहमीप्रमाणे विक्रम गायकवाड यांनी कसलीही कृत्रिमता जाणवू दिली नाही. तुलनेने कपडेपटामध्ये काही ठिकाणी कृत्रिमता जाणवते. विशेषत: नऊ वारी साडय़ा, सैन्यदलातील लोकांचे गणवेश वगैरे.

चित्रीकरणामध्ये तांत्रिक बाबी हल्ली बहुतांशपणे उत्तमच असतात, पण अगदी मोजक्या ठिकाणी का असेना काही दर्जेदार फ्रेम्स पकडण्यात यश आले आहे. दिग्दर्शकाने  नेहमीच्या मेलोड्रामॅटिक पद्धतीचा वापर न करता अनेक ठिकाणी संथपणे एखादा मुद्दा ठसवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा प्रभाव न पडल्याने मालिका रटाळ वाटू लागते. त्यामुळे अनेक बाबी असतानादेखील मालिका दिग्दर्शनात फसते.

  • हुतात्मा
  • ऑनलाइन अ‍ॅप – झी ५
  • सीझन – पहिला