|| रवींद्र पाथरे

विनोदी नाटकाला प्रेक्षक येतात, टीव्हीवर चमकणारे दोन-तीन कलाकार त्यात घेतले की यशाची हमीही पक्कीच असा काही निर्मात्यांचा समज आहे. या समजाला आधार असतो तो यशस्वी होणाऱ्या एक-दोन विनोदी नाटकांचा. पण ती चालण्यामागचं कारण केवळ त्यात टीव्हीवर चमकणारे कलाकार आहेत अथवा ती विनोदी आहेत हेच नसतं, तर प्रेक्षकांना धरून ठेवणारं वेगळं काहीतरी त्यात असतं. पण यावरून विनोदी नाटकं चालतात असा सरधोपट समज करून घेण्यात काही अर्थ नाही. एक खरंय, की लोकांना मनाला विरंगुळा देणारी नाटकं जास्त आवडतात. पण ती विनोदी असायला हवीत असं बिलकूल नाही. ‘सं. देवबाभळी’, ‘वाडा..’ नाटय़त्रयी यांसारखी गंभीर, आशयगर्भ नाटकं मग चाललीच नसती. असो. हे सारं चर्चायचं कारण.. ‘ह्य़ांचं करायचं काय?’ हे नवं नाटक. विशाल कदम लिखित आणि राजेश देशपांडे संस्कारित व दिग्दर्शित हे नाटक विनोदी पठडीतलंच आहे. समीर चौगुले, विशाखा सुभेदार आणि पॅडी कांबळे यांच्यासारखे विनोदाचे एकापेक्षा एक हुकमी एक्के त्यात मौजूद आहेत. परंतु क्षीण नाटय़बीजामुळे नाटक फिरून फिरून एकाच जागी रिंगण घालत राहतं.

कोल्हापूरपासून काहीसा दूर असलेला एक महाल कम् वाडा त्याच्या मालकांनी विकायला काढल्याची जाहिरात वाचून पोपट (पॅडी कांबळे) हा मध्यस्थ एका ‘भाई’करता तो विकत घेण्यासाठी वाडय़ाच्या मालकाला- श्री. भुते (समीर चौगुले) यांना  भेटायला येतो. पण वाडय़ात पाऊल टाकतानाच त्याची गाठ पडते ती वाडय़ाची मालकीण मंगल भुते (विशाखा सुभेदार) हिच्याशी. ती एका उतारवयीन व्यक्तीशी प्रेमसंभाषित करीत असते. तिचे यजमान घराबाहेर गेले असावेत असं पोपटला वाटतं. त्यांचा तो भलत्या वयातला रोमान्स पाहून पोपट दुग्ध्यात पडतो. आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना, असं त्याला वाटतं. ती दोघं मग पोपटलाच घोळात घेतात. या झमेल्यातून आपली कशी सुटका करून घ्यायची या फिकीरीत पोपट असतानाच भाईचा फोन येतो आणि तो पोपटला लवकरात लवकर हे ‘डील’ करण्याची धमकी देतो. या वाडय़ाशेजारून सरकारने नव्या रस्त्याचं प्लॅनिंग केल्याची खबर भाईला लागलेली असते. त्यामुळे वाडा लगोलग विकत घेऊन त्यावर बक्कळ पैसा कमावण्याची त्याची मनिषा असते.

इकडे पोपट त्या जोडप्याच्या ‘नाटका’त अडकतो. ते त्याला घोळवत राहतात. अशात त्या वाडय़ातले पूर्वजही एक-एक करून अवतरतात आणि पोपटची हबेलंडी उडते. हा भुताटकीचाच वाडा आहे याबद्दल त्याची खात्रीच पटते. तेव्हा जितक्या लवकर इथून बाहेर पडता येईल तितकं बरं अशी मनाशी खूणगाठ बांधत पोपट तिथून बाहेर पडण्याचा खूपदा प्रयत्न करतो. पण वाडय़ातले पूर्वज अकस्मात प्रकट होऊन त्याला आणखीनच संभ्रमित करतात. सलीम-अनारकली, मावळा, झाशीच्या राणीसदृश्य राणी अशी नाना पात्रं येऊन त्याच्या डोक्याचा भुगा करतात. आता तर पोपटच्या मनात कसलीच शंका उरत नाही- हा वाडा भूतपिशाच्चबाधित आहे याबद्दल! वाडय़ात पूर्वजांचा वावर असल्याचं त्याने स्वत:च अनुभवलेलं असल्याने तो विकत घेण्यात काहीच अर्थ नाही, हे त्याला कळून चुकतं. वाडय़ात वावरणाऱ्या या मंडळीपैकी कुणाचा वाडा विकायला विरोध असतो, तर कुणाचा पाठिंबा. पण हे ‘डील’ म्हणजे चक्क भुताशीच ‘डील’ करण्यासारखं आहे, याची जाणीव झालेला पोपट भाईला तसं सांगायचा प्रयत्न करतो. परंतु  भाई काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. उलट, वाडा विकत घेण्यासाठी तो घायकुतीला आलेला असतो. त्याचे फोनवर फोन येत असतात. पोपटचं दोन्ही बाजूनं मरण होतं..

विशाल कदम लिखित ‘ह्यांचं करायचं काय?’ या नाटकाचा जीव फारच लहान आहे. राजेश देशपांडे यांनी संहितेवर संस्करण करून ती काहीशी फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मूळ संहितेत पाणी घालून घालून असं कितीसं घालणार? शाब्दिक विनोद आणि स्लॅपस्टिक कॉमेडीच्या आधारे त्यांनी नाटक फुलवायचा प्रयत्न केला आहे. वर तिला फॅन्टसीचा तडकाही दिला आहे. मात्र, इतकं करूनही हाती फार काही लागत नाही. राजेश देशपांडे यांचा चमत्कृतीजन्य शाब्दिक विनोदावर नेहमीच भर असतो. त्याने क्षणिक गंमतही येते. परंतु त्यापल्याड ते जात नाहीत. त्याने होतं काय, की आता काहीतरी घडेल, नंतर काहीतरी यापेक्षा वेगळं घडेल, या आशेवर असलेल्या प्रेक्षकाचा भ्रमनिरास होतो. कलाकारांनी कितीही जीव तोडून कामं केली तरी मुदलात फार काही नसलं तर ते तरी काय करणारे बिचारे? त्यांच्या परीनं ते धडपडतात. आपला अनुभव पणाला लावून परिस्थितीजन्य विनोदाद्वारे हशा आणि टाळ्या मिळवायचा प्रयत्न करतात. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही होतात. परंतु त्याने प्रेक्षकांच्या पदरी समाधान मात्र पडत नाही. नाटकात काही ठिकाणी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्या वेगवान संवादफेकीने काही विनोद हशे वसूल न होताच वाया जातात. ही त्रुटी वगळता तिघांचीही कामं त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी प्रकाशयोजना आणि नेपथ्यातून गूढतेचा जो भास निर्माण केला आहे, तो नाटकाची मागणी पुरवतो. अजित परब यांचं संगीत नाटय़ांतर्गत उत्सुकता ताणतं. पाश्र्वसंगीत संयोजन अमित पाध्ये यांचं आहे. मंगल केंकरे यांची पात्रानुकूल वेशभूषा चपखल. अशोक राऊत यांची रंगभूषाही चोख.