हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी एका आरजेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गझल गायक केसीराजू श्रीनिवासला अटक केली आहे. श्रीनिवासच्या मालकीच्या ‘आलयावाणी वेब रेडिओ’मध्ये AalayaVani Web Radio काम करत असलेल्या या महिलेने आपला गेल्या बऱ्याच दिवसांपासून लैंगिक छळ केल्याचा आरोप लावल्याचे वृत्त ‘गल्ट डॉट कॉम’ने प्रसिद्ध केले आहे.

श्रीनिवास विरोधात पोलिसांत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर याविषयीचा तपास करण्यात आला आणि आवश्यक पुरावे हाती लागताच पोलिसांनी श्रीनिवासला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबरला पीडितेने श्रीनिवासविरोधात तक्रार दाखल केली होती. जून २०१७ पासून ती श्रीनिवासला ओळखते. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिला बॉडी मसाज करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कलम ३५४, ३५४ अ आणि ५०९ अंतर्गत श्रीनिवासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास आपल्याला खासगी फोटो पाठवण्यासाठीही जबरदस्ती करायचा असा आरोप पीडितेने केला आहे. पण, आपण तिला मुलीप्रमाणे वागवले होते, असे म्हणत श्रीनिवासने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘काही दिवसांपूर्वीच आपला अपघात झाला होता. त्यामध्ये खांद्याला दुखापत झाली होती. त्यासाठी डॉक्टर (फिजिओथेरेपिस्ट) येऊन त्यावर उपचार करत असत. पण, एक दिवस ती डॉक्टर न आल्यामुळे खुद्द त्या मुलीनेच (आरजेने) स्वत:च मला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती,’ असे श्रीनिवासचे म्हणणे आहे.