प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात. कठीण काळात संयमाने वागून सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याचा फायदा अशा वेळी निश्चितच होतो. या समस्यांना सेलिब्रिटीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा नैराश्याला सामोरी गेली आहे. याआधीही तिने याविषयी खुलेपणाने बोलून दाखवलं. मात्र केवळ त्या परिस्थितीमुळे नकारात्मक होऊन न बसता परिणीतीने इतरांनाही प्रेरणा दिली आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली.

“आयुष्यातील कठीण काळ हा खूप काही शिकवून जातो. तो काळ निघून गेल्यानंतर तुम्ही आणखी कणखर बनता. २०१४चा शेवट आणि संपूर्ण २०१५ हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होतं. व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर जे काही माझ्यासोबत घडत होतं, ते पाहून मला वाटलं नव्हतं की मी यातून पुन्हा बरी होऊन वर येईन. त्यावेळी मी करिअरमध्येही ब्रेक घेतला होता. यशापेक्षा अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जातो. ही गोष्ट मी तेव्हा अनुभवत होते. सकारात्मक असं काहीच माझ्याकडे राहीलं नव्हतं. पण सुदैवाने मी त्यातून बाहेर आले आणि आता पूर्वीपेक्षा मी खूप जास्त सकारात्मक असते. कदाचित हे चढ-उतार माझ्या आयुष्यात आले नसते, तर ते खूप कंटाळवाणं झालं असतं”, असं ती म्हणाली.

परिणीतीने दीड वर्ष नैराश्याशी झुंज दिली. ‘दावत-ए-इश्क’ आणि ‘किल दिल’ हे तिचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. आयुष्यात पहिल्यांदाच ती पराभवाला सामोरी गेली होती. त्याचवेळी हातातून पैसासुद्धा गेला. जे काही पैसे होते त्यातून तिने नवीन घर घेतलं होतं आणि काही गुंतवणूक केली होती. त्याचवेळी तिचं ब्रेकअप झालं होतं. या सर्व गोष्टींचा परिणाम परिणीतीच्या मानसिक स्वास्थावर झाला. नैराश्याच्या या काळानंतर २०१६ पासून नवी सुरूवात केल्याचं परिणीतीने सांगितलं.