प्रयोगशीलता आणि व्यावहारिक कौशल्य यांचा मेळ साधत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळे प्रयोग होत आहेत. ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ हे चित्रपट वेगळ्या मांडणीमुळे मला आवडले. वेगळ्या विषयासंदर्भात विचारणा झाली तर मराठी चित्रपट नक्कीच करेन, अशी भावना ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने शुक्रवारी व्यक्त केली.
जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये सुरू झालेल्या नव्या पीएनजी बुटिक स्टोअरमध्ये हिऱ्यांच्या अलंकारांची टाईमलेस ही दागिन्याची श्रेणी माधुरी दीक्षित हिच्या हस्ते शुक्रवारी सादर झाली. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ या वेळी उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वेगळ्या वाटेवरचे चित्रपट केले जात आहेत. विषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे या चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरले आहे. मलाही असा एखादा वेगळा विषय मिळाला तर मराठी चित्रपटातून भूमिका साकार करायला निश्चितपणे आवडेल, असेही माधुरीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे चित्रपटसृष्टीतील कलाकार सामाजिक काम करीत आहेत. असे तुला करावेसे वाटते का, असे विचारले असता माधुरी दीक्षित म्हणाली, नाना आणि मकरंद यांनी सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे. मीही सामाजिक जबाबदारीचे भान असलेली व्यक्ती असून महिला आणि लहान मुलांसाठी मी काम करत असते. त्या कामाचे स्वरूप निराळे आहे.
कौटुंबिक जबाबदारी पेलून कला क्षेत्रातील कारकीर्द कशी सांभाळतेस असे विचारले असता कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे माधुरीने सांगितले. प्राधान्यक्रम ठरवून कामाचे नियोजन करीत असल्यामुळे दोन्ही गोष्टींची कसरत जमते, असेही तिने सांगितले.