बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची बॉलीवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत गणना केली जात असली तरी खऱया आयुष्यात आपण एका फकीराप्रमाणे असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
माझ्यासोबत काम करणाऱया व्यक्तींना तुम्ही मी कसा आहे? असे विचारले तर ते माझी स्तुती करतील. कारण, कामाच्या व्यतिरिक्त त्यांच्याशी काही संबंध येत नसल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल इतर काय सांगावे? हे काही सुचणार नाही. पण मी यशाला चिटकून राहणारा व्यक्ती अजिबात नाही. खऱया आयुष्यात मी एखाद्या फकीरासारखा आहे, असं बोलणं थोडं वेगळं वाटेल पण तेच सत्य आहे. मी महागडे कपडे परिधान करतो, टापटीप राहतो आणि एक स्टार म्हणून वावरताना ज्या ज्या गोष्टी करतो तो सर्व खरंतर एक प्रकारचा अभिनयाचाच भाग असतो, असं म्हणायला काहीच हरकत नाही. एक स्टार म्हणून जगण्याची मला सवयच लागली आहे. पण मी खरा तसा व्यक्ती नाही. मला माझ्या खऱया कमाईचा आनंद घेताच येत नाही. त्यामुळे मी खऱया आयुष्यात एक फकीर आहे, असे शाहरुख खान म्हणाला.