अभिनेता रणवीर सिंग त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्तही जास्त त्याच्या खोडकर अंदाजासाठी ओळखला जातो. रणवीरने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यापासूनच त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत आहे. सध्या रणवीर त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटामध्ये रणवीरने अशी काही दृश्ये दिली आहेत ज्यांमध्ये तो फक्त अंतर्वस्त्रांमध्ये दिसत आहे. त्यामुळे अंतर्वस्त्रांमध्ये इतक्या सहजतेने वावरणाऱ्या रणवीरला त्याबाबत काहीच संकोचलेपणा वाटत नाहीये. असे त्यानेच स्पष्ट केले आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अभिनेता रणवीर सिंगने त्याचे याबाबतचे मत मांडले आहे. ‘मला असे वाटते की, मी माझ्या शरीराबद्दल कम्फर्टेबल आहे. तसं पाहिलं तर मी बेशरमच आहे. प्रामाणिकपणे सांगावं तर माझ्या मते नग्नता निरर्थक आहे. एक अभिनेता म्हणून मी तुम्हाला माझ्या अंतरंगात डोकावण्यास देतोय. त्यामुळे मी त्यापलीकडे जाऊन काही वेगळे करणार नाहीये. त्यापलीकडे मी आणखीन विवस्त्र होणार नाहीये’, असे रणवीरने स्पष्ट केले.

‘बेफिक्रे’ या चित्रपटातील रणवीरच्या अंतर्वस्त्रांनी अनेकांचेच लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावरही सध्या त्यासंबंधीचीच चर्चा सुरु आहे. अभिनेता शाहरुख खाननेसुद्धा ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये रणवीरच्या अंतर्वस्त्रांविषयी खिल्ली उडवली होती. त्याचविषयी रणवीरला प्रश्न विचारला असता, ‘मी त्याविषयी करणच्याच कार्यक्रमामध्ये उत्तर दिले आहे. त्यामुळे सध्यातरी तुम्हाला त्या भागाची वाट पाहावी लागणार आहे’, असे त्याने सुचवले. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता रणबीर कपूर हे दोघेही करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये दिसणार आहेत. त्यामुळे करणसह केलेली धम्माल-मस्ती त्या भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, ‘बेफिक्रे’ या चित्रपटानंतर रणवीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दिपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये रणवीर अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. २०१७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.