हिंदी चित्रपटातील ठराविक प्रकारच्या भूमिकाच वाट्याला येत असल्याने अभिनेत्री रिया सेन नाराज असून, तिला आपल्या अभिनयात विविधता आणायची इच्छा आहे. हा विचार तिला सतत सतावत असतो. बॉलिवूडमध्ये सतरा वर्षे काम केल्यानंतर आता आपल्याला पैसे कमविण्यात रुची नसल्याचे सागत ती म्हणाली, मला अशा प्रकारची भूमिका साकारायची आहे जी मला उत्साहित करेल. मी करत असलेल्या कामाचा आनंद मला लुटायचा आहे. जर का तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेऊ शकला नाहीत, तर तुम्हाला कंटाळवाणे वाटू लागते. ‘डार्क चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात ती शीना बोराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणाली, चित्रपटाच्या प्रदर्शनात आता कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याने आनंद होत आहे. वादांबाबत मी अनभिज्ञ असून, शीना बोरा प्रत्यश जीवनात कशी होती, हे देखील मला माहीत नाही. मी केवळ दिग्दर्शकाच्या आज्ञेचे पालन केले असल्याचे ती म्हणाली. दिवंगत रितुपर्णो घोष यांच्या नौकाबंदीमध्ये तिने साकारलेली भूमिका बंगाली चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतची तिची सर्वात शानदार भूमिका आहे.