बॉलिवूड अभिनेता साकिब सलीम याने आपल्याला रणबीर कपूरच्या चित्रपटसृष्टीतील एकुणच प्रवासाविषयी असूया वाटत असल्याचे सांगितले. ज्या रितीने रणबीर कपूर एक अभिनेता म्हणून उदयाला आला, तिथपासून त्याचा चित्रपटसृष्टीतील स्टार बनण्याचा प्रवास हेवा वाटण्याजोगा असल्याचे साकिबने सांगितले. ‘मुझसे फ्रांडशिप करोगे ?’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साकिबच्या मते रणबीर कपूरने केलेल्या चित्रपटांच्या यादीवर नजर टाकल्यास अशाप्रकारचे चित्रपट करायला मिळणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. रणबीरने आजवर व्यवसायिक आणि पठडीबाहेरचे अश्या दोन्हीप्रकारच्या चित्रपटांत काम केले आहे. त्याच्या चित्रपटांचा चढता आलेख पाहून मला रणबीर आणि त्याच्या एकूणच चित्रपट कारकिर्दिविषयी असूया वाटते असे साकिबने सांगितले. रणबीर कपूरमध्ये अभिनेता आणि स्टार यांचे उत्तम मिश्रण असल्याच्या भावना साकिबने पीटीआयशी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी साकिबने चित्रपटसृष्टीतील वरूण धवन, अर्जून कपूर आणि राजकुमार राव या अभिनेत्यांचीसुद्धा मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘मै तेरा हिरो’ मधील वरूण धवनचे काम आपल्याला खूप आवडल्याचे सांगत आपण याबद्दल त्याचे अभिनंदनही केल्याचे साकिबने सांगितले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘हवाहवाई’ या चित्रपटात साकिबने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.