शाहरुखने त्याच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रसिद्धीमध्ये कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. तो सर्व प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये गेला. तसेच, त्याने शहरांचे व जागतिक दौरेही केले आणि चाहत्यांशी फेसबुकवरून लाइव्ह चॅटही केले. तरीही, आपण मार्केटिंग गुरु नसल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे. प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांबाबत माहिती देण्यास आवडत असल्याचे तो म्हणतो. पण, या बॉलीवूड बादशाहाने केलेल्या जाहिरातीमुळे रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सर्वाधिक जलद १०० कोटी कमवणा-या चित्रपटांच्या यादीत तर पोहचला असला तरी चित्रपट समीक्षकांचेही ब-यापैकी रिव्ह्यू मिळाले आहेत.
शाहरुख म्हणतो की, मी मार्केटिंग गुरु किंवा रोमॅण्टिक हिरो नाही. माझ्या चित्रपटांबाबत प्रेक्षकांना माहिती मिळावी यासाठी मी चित्रपटांची जाहिरात करतो. चित्रपट पाहण्यासाठी ते पैसे खर्च करतात, त्यामुळे चित्रपटाची माहिती मिळण्याचा प्रेक्षकांना अधिकार असल्याचे मला वाटते.
यापूर्वी त्याची निर्मिती असलेल्या ‘रा.वन’ चित्रपटाचीही शाहरुखने जाहिरात केली होती. ‘रा.वन’ हा वेगळ्या शैलीचा चित्रपट असल्यामुळे मी त्याच्या प्रसिद्धीस प्रोत्साहन दिले. ‘जब तक है जान’ हा प्रेमकथेवर आधारित असल्यामुळे आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचे अचानक निधन झाल्यामुळे मी दुःखी होतो. त्यामुळे त्याची मी अधिक जाहिरात केली नाही, असेही शाहरुख म्हणाला.
शाहरुखच्या रेड चिली आणि डिस्नी यूटीव्हीची संयुक्त निर्मिती असलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ तिकीटबारीवर चांगलाच यशस्वी ठरत आहे.