गेले काही दिवस अभिनेता पुल्कित सम्राट हा यामी गौतमशी प्रेमसंबंध असल्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे. लग्नाला केवळ एक वर्ष होत नाही तोवर पुल्कित पत्नीपासून वेगळा झाल्याने त्याचे नक्कीच यामीवर प्रेम आहे अशी चर्चा रंगू लागलीय. पण पुल्कितने आपण कोणालाही डेट करत नसल्याचे सांगत यामीसोबत प्रेमसंबंधाच्या बातमीचे खंडण केले.
पुल्कित आणि यामी हे आगामी ‘सनम रे’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात त्याला यामीसोबत त्याचे नाव जोडले गेल्याच्या बातमीबद्दल विचारले असता तो म्हणाला, मी कोणालाच डेट करत नाहीए आणि यामीच मला काही माहित नाही. तर दुसरीकडे यामीने मात्र यावर भाष्य करणे टाळत विषयांतर केले. ती म्हणाली, सनम रे चित्रपटाने पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे घेतली. हा खूप छान चित्रपट असून आतापर्यंत याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारून या सगळ्याला झाकाळू नका.
गेल्वावर्षी पुल्कितने श्वेता रोहिराशी विवाह केला होता. पण हे लग्न जेमतेम वर्षभर टिकले. त्यावर श्वेताशी समेट करण्याचा काही विचार आहे का? असे विचारले असता पुल्कित म्हणाला, आम्ही स्वतः याविषयी काही ठरवलेल नाही तर तुम्हाला काय सांगणार. यावेळी पुल्कितने ‘सनम रे’ हा चित्रपट त्याच्यासाठी गुरुस्थानी असलेल्या सलमान खानला दाखविण्याची इच्छा व्यक्त केली.