गोव्यात ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार या महोत्सवाला हजेरी लावत आहेत. सोमवारी उद्घाटन सोहळ्याला ‘न्यूटन’ फेम अभिनेता राजकुमार रावसुद्धा उपस्थित होता. यावेळी बोलता बोलता राजकुमारने तेथे उपस्थित असलेल्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींची सहज थट्टा केली. पण त्याच्या या मस्करीला स्मृती इराणींनीही खोचक उत्तर दिले.

राजकुमार म्हणाला की, ‘माजिद माजिदी (चित्रपट ‘बियाँड द क्लाऊड्स’चे दिग्दर्शक) हे ‘इराणी’ आहेत आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणीसुद्धा इथे आहेत, काय योगायोग आहे हा!’ हे ऐकून तेथे उपस्थित असलेले प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि स्मृती इराणीसुद्धा हसल्या. त्यानंतर जेव्हा त्या मंचावर आल्या तेव्हा याचं उत्तर त्यांच्यात अंदाजात दिलं. ‘राजकुमार, संपूर्ण देशाला हे कळलं पाहिजे की तू एका मंत्र्याच्या नावावरून थट्टा केलीस. यावरुन हे सिद्ध होत आहे की सरकार म्हणून आम्ही किती सहिष्णू आहेत,’ असे खोचक उत्तर तिने दिले.

वाचा : दीपिकाचे शिर सुरक्षित राहावे- कमल हसन

काही दिवसांपूर्वी फराह खानच्या रिअॅलिटी शोसाठी शूटिंग करताना राजकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीवरूनही इराणी पुढे म्हणाल्या की, ‘राजकुमार मी तुझे आभार मानू इच्छिते कारण भाजप नेत्यांना असे म्हटल्याने तुला मारहाण करण्यात आली असे कोणी आता म्हणणार नाही.’