भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवाचे हे ४९ वे वर्ष असून या सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यातच नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरनेदेखील उपस्थिती लावली होती. मात्र यावेळी आईच्या आठवणीने ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूडची ‘हवाहवाई गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र त्यांच्या आठवणींनी आजही प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इफ्फीमध्येही हा प्रसंग अनुभवायला मिळाला. या प्रसंगामध्ये ‘मी आईची जागा कधीच घेऊ शकत नाही’, असं जान्हवी म्हणाल्याचं पाहायला मिळालं.

‘बॉलिवूडमध्ये २०१८ हे वर्ष अनेक घडामोडींचं ठरलं असून अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर अनेक नवोदित कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यातच जान्हवीने धडक या चित्रपटातून डेब्यू केलं. जान्हवीच्या या पहिल्याच चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे जान्हवी आता श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवते का असं साऱ्यांना वाटत होतं. मात्र ते कधी शक्य नसल्याचं’ खुद्द जान्हवीने म्हटलं आहे.
या वर्षामध्ये माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. काही बदल प्रचंड दु:ख आणि त्रास देणारे होते. तर काही बदल सुखावणारेदेखील होते. मी याच वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि याच वर्षात माझी आई मला सोडून गेली. तिच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मात्र कलात्मक होणं म्हणजे नक्की काय असतं. हे मला अजून समजलं नाही. त्यामुळे एक गुणी अभिनेत्री होईन पण आईसारखी होईन की नाही हे माहित नाही. तिची जागा घेणं मला कधीच शक्य होणार नाही, असं जान्हवी म्हणाली.

दरम्यान, करण जोहरच्या धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी जान्हवी लवकरच ‘तख्त’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.