बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही कधीच कोणतेही वक्तव्य करताना कचरत नाही. तिच्या मनातील विचार ती उघडपणे न घाबरता बोलते. हा, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलणं ती ब-याचदा टाळण्याचा प्रयत्न टाळते. तिच्या खासगी आयुष्याविषयी ती नेहमीच हात राखून बोलते. असे असूनही काही दिवसांपूर्वीच तिने या वर्षी ती लग्न करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. आता आपण कुटुंब तयार करून आपली मुलंही असायला हवी असे कंगनाला वाटते. पण, मुलं जन्माला घालण्यासाठी लग्न करण्याचीच आवश्यकता नसल्याचेही तिला वाटते.

एचटी कॅफेला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिच्या लग्नाविषयीच्या काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, होय, मी यावर्षी लग्न करण्याचा विचार करतेय हे सत्य आहे. आपण ज्या जगात सध्या जगतोय तिथे डेटिंग करणे फार त्रासदायक बनले आहे. स्वतःसाठी उत्तम जोडीदार निवडण्याकरिता जो तो दुस-याच्या खांद्यावरून डोकावून पाहण्यात रमलेला आहे. कोणत्याही नात्यात समर्पणाची गरज असते. डेटिंग कितीही गंभीर असलं तरी त्यात वचनबद्धता पाहावयास मिळत नाही. लग्नाविषयी बोलताना कंगना म्हणाली की, मला नात्याला गंभीरपणे पुढे न्यायला आवडेल. माझी हीच विचारसरणी असून यावर्षी मी लग्न करेन.

अजूनही सिंगल असण्याबद्दल कंगना म्हणाली की, एकटं राहणं फार कठीण असतं. खासकरून, त्यावेळी जेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत नसतं. अशा वेळी तुम्ही विश्वास ठेवावा अशी कोणीच व्यक्ती तुमच्यासोबत नसते. लग्नाबद्दल इतरांच्या विचारसरणीविषयी बोलताना ती म्हणाली की, मी अजून तरुण असून, मला लग्न नाही करायचं यावर लोक हैराण होतात. लग्नाचे वयाशी काहीच देणं घेणं नसतं. लग्न आणि करियर हे एकमेकांना जोडले गेलेत असे मला वाटत नाही.  यावर्षी मार्च महिन्यात मी ३० वर्षांची होईन आणि आता मला मुलं असायला हवीत (हसत) असे मला वाटते, असेही कंगना म्हणाली. पुढे तिच्या बोल्ड अंदाजात कंगनाने हेही म्हटले की, मुलांसाठी लग्न करणं हे गरजेच आहे असंही नाही. पण, स्वतःचं कुटुंब तयार करावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. फिल्मी दुनियेत लोक एकटी असू शकतात. खासकरून, जेव्हा तुम्ही एक कलाकार असता.

दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा पीरियड ड्रामा असलेला ‘रंगून’ चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात कंगना रणौत हिच्यासह शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बनला आहे.