महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर समोर येते ते पुलंचेच नाव. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्र आजही जाणतो. त्यांच्या आयुष्यावर भाई हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. मात्र दुर्दैव हे की या सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती येत असताना त्याचे स्वागत व्हायला हवे. विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यात तर पुलंचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. तिथेही त्यांच्यावरच्या सिनेमाला स्क्रीन्स मिळू नये ही लाज वाटण्याचीच बाब आहे. याचमुळे सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजेरकर म्हणत आहेत, ”होय मला लाज वाटते आहे मला मी मराठी असल्याची!” एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमातले पात्र, ‘लाज वाटते मला मी मराठी असल्याची’ असा संवाद म्हणत असतं. वास्तवात हेच म्हणण्याची वेळ महेश मांजरेकर यांच्यावर आली आहे. हा फक्त पुलंवरच्या सिनेमाचा प्रश्न नाही तर मराठी सिनेमांमध्ये विविध वेगळे विषय मांडले जात असतानाही त्यांना न्याय मिळत नाही. त्याविरोधात कोणी आवाजही उठवत नाही, राज ठाकरे यांचा अपवाद वगळला तर एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही. तसे असते तर असे घडलेच नसते असेही महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे. सिंबा या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे मल्टिप्लेक्समध्ये एका आठवड्यानंतरही भरपूर शो आहेत. १५० ते ३०० शो रोज मुंबई, पुण्यात पार पडत आहेत. अशात ‘भाई’ या मराठी सिनेमाला मात्र अवघे ४० ते ५० शो देण्यात आले आहेत.

‘सिम्बा’च्या वितरकांचा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत आहे त्यामुळे अनेकांनी ‘भाई’ चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. वितरकांच्या दबावामुळे इच्छा असून चित्रपट दाखवता येत नाही अशा कोडींत मालक सापडल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यातून मुंबई- पुण्यासारख्या चित्रपटगृहातून ‘सिम्बा’नं बक्कळ कमाई केली आहे. आता एक आठवडा कमाई केल्यानंतरही पुन्हा त्याच सिनेमाला महत्त्व दिले जाते आहे. एकाही मराठी नेत्याला याबाबत आवाज उठवावासा वाटत नाही अशीही खंत महेश मांजरेकरांनी त्यांच्या मुलाखतीत बोलून दाखवली.

‘भाई- व्यक्ती आणि वल्ली’ हा पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यवर आधारीत सिनेमा आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये येणार आहे. उद्या यातला पहिला भाग प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात सागर देशमुख, इरावती हर्षे, ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.