गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक आणि ट्विटरवर आलोकनाथ यांच्यावरील विनोद, मेसेज बरेच गाजले होते. त्यांची सज्जन, प्रेमळ बापाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून आशीर्वाद आणि कन्यादान या विषयावरील विनोदांची सर्वत्र पखरण सुरू होती. त्यामुळे आधी गोंधळलेल्या आलोकनाथ यांनी नंतर मात्र आपल्यावरील हे विनोद खिलाडूपणे स्वीकारायला सुरुवात केली. या विनोदांमुळेच मला वेगळ्या धाटणीची कामे मिळू लागली आहेत. एकप्रकारे या विनोदांचा माझ्या कारकिर्दीवर सकारात्मक परिणाम झाला, असे त्यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
सब टीव्हीवरील ‘तू मेरे अगल बगल है’ या कार्यक्रमाद्वारे आलोकनाथ सोमवारपासून पुन्हा एकदा ‘बाबूजीं’च्या भूमिकेत शिरले आहेत. पण यावेळी या बाबूजींचा तोरा काहीसा वेगळा आहे. या कार्यक्रमातील माझी भूमिका या विनोदांवरच आधारित आहे. हे बाबूजी आदर्श वडिलांचे उदाहरण असून इंटरनेटवरील गाजलेल्या विनोदांचा वापर संवाद म्हणून करण्यात आला आहे, अशी माहिती आलोकनाथ यांनी दिली. गेली काही वर्षे मला मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये चांगल्या वडिलांच्या, चांगल्या सासऱ्याच्या, चांगल्या आजोबांच्या भूमिका मिळत होत्या. त्या भूमिकांना कदाचित प्रेक्षकही कंटाळले होते. त्यामुळे कदाचित या सर्वाकडे विनोदी ढंगाने पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. नाहीतर विनोदनिर्मिती होऊ शकेल, असे माझ्या देहबोलीमध्ये काही आहे, असे मला तरी वाटत नव्हते, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
सुरुवातीला केवळ विनोद म्हणून सुरू झालेल्या या मेसेजचे रुपांतर पाहता-पाहता एका ट्रेंडमध्ये झाले. त्यामुळेच मला काही वेगळ्या भूमिका देण्याची गरज निर्मात्यांना भासू लागली. त्यामुळे सध्या मला अनेक हलक्याफुलक्या, गंभीर किंवा खलनायकी छटेच्या भूमिका साकारायची संधी मिळत आहे. त्यामुळे मी लोकांचा आभारी आहे, असे आलोकनाथ यांनी प्रांजळपणे सांगितले.