चौकटीबाहेरचे विषय हाताळत हटके भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा नव्या दमाचा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. ‘अंधाधून’ या चित्रपटासाठी त्याला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर होताच पाच मिनिटांत ४० मिस्ड कॉल आल्याचं आयुषमानने सांगितलं. ‘ड्रीम गर्ल’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात आयुषमानने राष्ट्रीय पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या.

पुरस्कार जाहीर होतेवेळी तो एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता.  त्यानंतर जेव्हा त्याने मोबाइल पाहिला तेव्हा पाच मिनिटांत जवळपास ४० मिस्ड कॉल त्याला दिसले. राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय यावर अजूनही त्याचा विश्वास बसत नव्हता.

आयुषमानसोबतच अभिनेता विकी कौशलला ‘उरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याविषयी तो म्हणाला, ”पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्वांत आधी विकीनेच मला कॉल केला होता. तो स्वभावानेही खूप चांगला आहे. मीसुद्धा त्याला मेसेज करून शुभेच्छा दिल्या होत्या. विकी खूप प्रतिभावान आहे आणि आम्ही दोघंही पंजाबी असल्याने एकमेकांशी पंजाबी भाषेतच बोलतो. असे खूप कमी अभिनेते आहेत जे एकमेकांशी मातृभाषेत बोलतात. त्यामुळे विकीसारखा मित्र मला भेटल्याचा मला खूप आनंद आहे.”

आणखी वाचा : बिग बॉसमध्ये येण्यासाठी अभिजीत केळकरने मला फसवले- पुष्कर श्रोत्री 

रेडिओ, टेलिव्हिजन आणि आता चित्रपट असा प्रवास आयुषमानने केला. या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटल्याचं तो सांगतो. आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुषमान आणखी एक हटके भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.