एक कलाकार, गृहिणी आणि मथुरा या आपल्या मतदारसंघातील कामाबाबतची बांधिलकी यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पेलताना स्वत:साठी फारच कमी वेळ मिळत असल्याचं अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनीचे म्हणणे आहे. आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनशैलीचा तपशील या ६५ वर्षीय अभिनेत्रीने सोमवारी सकाळी टि्वटरवरील एका संदेशाद्वारे शेअर केला. टि्वटरवरील या संदेशात ती म्हणते, सुप्रभात! अनेक गोष्टी करण्यात गेल्या दोन दिवसांपासून व्यस्त आहे! बरीच कामे साठली आहेत, आता या कामांची विभागणी करून महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यायचे आहे. माझ्या आयुष्यात वैविध्य असून, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मी एक कलाकार म्हणून काम करते, एक खासदार म्हणूनसुद्धा माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, घरातील कामेदेखील करायची आहेत. यादरम्यान, तिला प्रकृतीची आणि आरोग्याचीदेखील काळजी घ्यायची आसते. ती पुढे म्हणते, स्वत:साठी मला क्वचितच वेळ मिळतो. सकाळी लवकर उठून मी व्यायाम, योगा आणि पूजा करते. उरलेला दिवस विविध कामे करण्यात व्यस्त असतो.