ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काऊचविषयी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाला बरीच हवा मिळाली. कास्टिंग काऊच ही काही नवी गोष्ट नसून अनेकांनीच त्याचा सामना केला आहे. असं म्हणत चित्रपटसृष्टी किमान कोणावर बलात्कार करुन त्यांना सोडून देत नाही, उलट उदरनिर्वाहासाठी मदत करते असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ज्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींनाही याविषयीचे प्रश्न विचारण्यात आले.

मंगळवारी कलाविश्वात आणखी एका विषयाची चर्चा पाहायला मिळाली. ती म्हणजे अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाची. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. याच कार्यक्रमादरम्यान अभिनेता रणबीर कपूरलाही कास्टिंग काऊचविषयी प्रश्न विचारण्यात आला. ज्यामुळे रणबीरवर अनेकांनीच तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे ‘संजू’मधील रणबीरने साकारलेल्या भूमिकेबद्दल त्याची प्रशंसा करणारे चाहते पाहायला मिळाले तर दुसरीकडे मात्र याच अभिनेत्यावर तोफ डागणारे नेटकरी पाहायला मिळाले.

‘संजू’च्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्माते विधू विनोद चोप्रा यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्याचवेळी कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर मत मांडण्याविषयी रणबीरला प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर देत रणबीर म्हणाला, ‘मी तरी निदान आतापर्यंत अशा कोणत्याच गोष्टीचा सामना केलेला नाही आणि जर अशी कोणती गोष्ट अस्तित्वात असेल तर मी त्याचा निषेध करतो.’ पण, हे उत्तर देत असताना मध्येच तो ज्या प्रकारे हसला ते पाहता चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शन आणि खुद्द रणबीरला प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. ही काही विनोद करण्याची वेळ किंवा विनोद करण्याजोगा विषय नाही, असं म्हणत चाहत्यांनी रणबीरला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रणबीरची चांगलीच कानउघडणी झाल्याचं म्हणायला हरकत नाही.

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जातंय- रिचा चड्ढा