मी फक्त भीती आणि काळजी व्यक्त केली होती. मी भारतात असुरक्षित वाटत असल्याचं कधीच बोललो नव्हतो असं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते असं वक्तव्य केल्याने नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका करण्यात आली होती. सोशल मीडियावरही युजर्सनी नसीरुद्दीन शाह यांना खडे बोल सुनावले होते. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यता आला असून आपण तसं बोललोच नव्हतो असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे की, ‘असं झालं पाहिजे किंवा असं होईल हे मी बोललो नव्हतो. मी फक्त आठवण करुन देत आहे की, ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या नाकारु शकत नाही. या देशात लोकांना घेरण्यात आलं. त्यांचा धर्म विचारण्यात आला. मी फक्त आपली भीती आणि काळजी व्यक्त करत होतो. पण हे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं. मी भारतात असुरक्षित वाटत असल्याचं कधीच बोललो नव्हतो’.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मला फक्त माझ्या मुलांची नाही तर इतरांचाही चिंता आहे. माझी मुलं या देशाचं भविष्य असून त्याची चिंता व्यक्त करत होतो. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कोणत्या शब्दाने, वाक्याने देशद्रोह वाटला हे सांगावे. मी कधीच देशात राहायचं नाही असं म्हटलं नाही. पाकिस्तानचं मी नावही घेतलं नाही. तसंच भारतातील मुस्लिमांच्या काय समस्या आहेत याबद्दलही काहीच बोललो नाही. मला जे वैयक्तिक वाटलं ते बोललो, कदाचित वैयक्तिक उदाहण द्यायला नको होतं’.

‘मी फक्त माझ्या मुलांची नाही तर भारताच्या पुढच्या पिढीबद्दल मी चिंता व्यक्त केली. आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार केला पाहिजे. जो भेदभाव सुरु आहे, धर्मांमध्ये जो द्वेष आहे त्या सर्व गोष्टी गाढल्या पाहिजेत. मागे काय झालं हे न पाहता आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे’, असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

‘प्रत्येक हुशार व्यक्तीला राग आला पाहिजे. भीती नाही वाटली पाहिजे असं मी बोललो होतो. याला भीती पसरवणे असं कसं बोलू शकतो. मी मुस्लिम नाही फक्त एक भारतीय म्हणून बोललो होतो. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत, 200 वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. माझ्या कुटुंबाने देशसेवा केली आहे. कोणता अडथळा आमच्या मार्गात आला असं कधीच वाटलं नाही’, असंही नसीरुद्दीन शाह बोलले आहेत.

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह –
या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी खंत व्यक्त केली होती. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाहीये. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगलं किंवा वाईट याचं धर्माशी काही देणंघेणं नाही असं मला वाटतं. काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या मुलांना मी शिकवलं आहे. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरलं आणि तुमचा धर्म कोणता असं विचारलं तर ते काय उत्तर देणार याची मला चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नसेल.’