स्वच्छंद जगणाऱ्या चार मैत्रिणींची कथा घेऊन ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. करिना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या चौघींनी यात भूमिका साकारल्या आणि चित्रपटाने कमाईचा १०० कोटींचा आकडासुद्धा पार केला. बरेच बोल्ड संवाद आणि दृश्यांमुळे हा चित्रपट चर्चेत आला आणि सर्वाधिक वादग्रस्त ठरला तो म्हणजे स्वरा भास्करचं हस्तमैथुन करतानाचं दृश्य. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला, टिकाटिप्पणी केली. पण या सर्व गोष्टींकडे अभिनेत्री स्वरा भास्कर फारच सकारात्मकरित्या पाहते. यामुळेच समाजातील लोक स्त्रियांच्या इच्छेबाबत किमान बोलू तरी लागले असं ती म्हणते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या विषयावर सविस्तर भाष्य केलं. ‘हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ट्रोलला सामोरं जावं लागणार हे अपेक्षितच होतं. चित्रपटात असं दृश्य दाखवणं अनेकांसाठी धक्कादायक आहे आणि त्यावरून वाट्टेल ते बोलणारे बरेच लोक समाजात आहेत. मी बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणाने माझी मतं मांडते, मग ते राजकीय असो किंवा चित्रपटांविषयी. त्यामुळे हस्तमैथुनाच्या दृश्यावरून माझ्यावर टीका करण्याची संधी तर लोक सोडणारच नाही हे मला ठाऊक होतं,’ असं स्वरा म्हणाली.

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असून या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली हे चांगलंच झालं असं मत तिने मांडलं. पुढे ती म्हणते की, ‘स्त्रियांचं शरीर, त्यांच्या इच्छा, कामुकता याविषयी नेहमीच मौन बाळगलं जातं. नेहमीच गाणी किंवा तत्त्वज्ञानाच्या प्रतिकात्मक रुपात ती गोष्ट दर्शवली जाते. या चित्रपटात अशा गोष्टी मुक्तपणे दाखवल्या गेल्या आहेत.’

असे दृश्य साकारताना त्यात कुठलाही भडकपणा असू नये याची काळजी घ्यावी हे स्वरा आवर्जून सांगते. हस्तमैथुनाच्या दृश्याविषयीच येणाऱ्या नेटकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर देत हा चित्रपट एक प्रकारे महिला सबलीकरणाचं उदाहरण ठरतोय, असा आपला दृष्टीकोन तिने मांडला.