‘सर्वच क्षेत्रात प्रत्येक मुलीला वापरुन घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून सरकारी कार्यालयेही सुटलेली नाहीत. त्यामुळे तुम्ही केवळ चित्रपटसृष्टीच्याच मागे का पडला आहात? इथे बलात्कार करून मुलींना सोडून दिलं जात नाही कमीत कमी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न तरी सुटतो’ असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सरोज खानवर तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीनं तोफ डागली आहे. ‘सरोज खान यांच्याबद्दलचा आदरच निघून गेला आहे. या इण्डस्ट्रीतल्या ज्येष्ठ व्यक्ती या नात्यानं त्यांनी नवोदीत अभिनेत्रींना योग्य मार्ग दाखवायला हवा होता. पण त्यांना सरोज खान यांनी चुकीचा मार्ग दाखवला आहे. नवोदीत अभिनेत्री या निर्मात्यांच्या हाताखालचे गुलाम असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय’ अशा शब्दात श्री रेड्डीनं सरोज खान यांच्यावर टीका केली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांना चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊच संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. ‘चित्रपटसृष्टी कमीत कमी महिलांना बलात्कार करुन सोडून देत नाही तर कामही देते, आपल्याला नक्की काय करायचे आहे याचा विचार मुलींनी करायला हवा. तुम्हाला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या लोकांच्या हाती यायचे नसेल तर तुम्ही नाही येऊ शकत. तुमच्या जवळ जर कला आहे तर तुम्ही स्वतःला का विकता? चित्रपटसृष्टी आमची आई-बाप आहे, त्यामुळे तुम्ही तीला काहीही म्हणू नका,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावर श्री रेड्डीनं कडाडून टीका केली आहे.

चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचा वाईट अनुभव घेतलेली तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीनं काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून टॉपलेस निदर्शनं केली होती. इथलं जळजळीत वास्तव तिच्या या विरोधामुळे समोर आलं होतं. तर दुसरीकडे यावर काही बोलायचंच नाही असं सरोज खाननं एकप्रकारे सुचवल्यामुळे श्रीरेड्डी मात्र नाराज झाली आहे. सरोज खान यांच्या वक्तव्याची चर्चा आता सगळीकडेच दबक्या आवाजात सुरू आहे.