करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगाचे प्राण धोक्यात आहेत. चीनमध्ये जन्माला आलेला हा विषाणू इटली आणि जर्मनीनंतर आता अमेरिकेला आपले नवे क्रेंद्र करणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या यादीत आता संगीतकार अ‍ॅलन मेरल यांचे देखील नाव जोडले गेले आहे. ६९ वर्षीय अ‍ॅलन मेरल यांचा करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

अ‍ॅलन मेरल अमेरिकेतील प्रसिद्ध संगीतकार होते. ते प्रामुख्याने आपल्या रोमँटिक गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. २५ मार्चला करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. पाच दिवसांच्या संघर्षानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. अ‍ॅलन यांची मुलगी लॉरा हिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली.

कोण होते अ‍ॅलन मेरल?

‘अ टच टू मच’, ‘सँड ऑफ टाईम’, ‘युवर लव्ह टाईम’, ‘शेक मी’ यांसारख्या अनेक सुपरहिट म्युझिक अल्बमची निर्मिती अ‍ॅलन मेरल यांनी केली होती. त्यांचे ‘आय लव्ह रॉक अँड रोल’ हे गाणे विशेष गाजले होते. ८०च्या दशकात त्यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याकाळी त्यांची तुलना ‘लिनर’, ‘बॉब मार्ले’, ‘मायकल जॅक्सन’ या लोकप्रिय पॉपस्टार्सशी केली जात असे. अ‍ॅलन मेरल यांच्या मृत्यूमुळे अमेरिकन संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावरुन शोक व्यक्त करत आहेत.