अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या तुटलेल्या हृदयाला आता चांगल्याच पद्धतीने सांभाळण्यास शिकली आहे. यावेळी, तिने स्वतःला सावरण्यासाठी एकतर बाहेर सुट्टीवर जाण्याचे किंवा कामावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.

पत्रकारांशी बोलताना आलिया म्हणाली की, मी १६ वर्षींची होते तेव्हा माझा प्रेमभंग झाला होता. त्यावेळी मी तरुणाईत पाऊल टाकत असल्यामुळे माझ्या मित्रमंडळींसह वेळ घालवून ब्रेकअपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. आताच म्हणाल तर अशावेळी मी सुट्टीवर जाईन किंवा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन. मला वाईट नाही वाटणार.. खरं तर, मला वाईट वाटेल. जर एखाद्या गोष्टीचा शेवट होत असेल तर स्वाभाविकच त्यामागे काहीतरी कारण असणार. आणि जर त्या गोष्टीचा शेवट नको व्हायला असेल तर ती गोष्ट पुन्हा तुमच्याकडे येईल. जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी बनली असेल तर ती नक्कीच तुमच्याकडे परत येईल.

आलियासाठी प्रेमाची परिभाषा खूप वेगळी आहे. ती म्हणाली की, माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ दररोज बदलतो. एक मुलगा आणि मुलगी किंवा दोन प्रेमींच्यामध्ये असलेले नाते म्हणजे प्रेम असे मला नाही वाटत. दोन मित्रांच्यामध्येही प्रेमाचे नाते असू शकते. माझ्या मांजरीवर आणि कॉफी कपवरही माझे प्रेम आहे. आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान आलिया बोलत होती. यावेळी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी डेटिंग अॅप असलेल्या ‘टिंडर’शी हातमिळवणी केली. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात  शाहरूख खान, कुणाल कपूर, आदित्य रॉय कपूर, अंगद बेदी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने गौरी शिंदेच्या या चित्रपटाला कात्री न लावता प्रमाणपत्र दिले आहे. शाहरुख आणि आलियाच्या या चित्रपटाला यूए प्रमाणपत्र देण्यात आले आहे.