स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावांसाठी दबाव आणल्याची चर्चा रंगली असताना स्वतः लतादीदींनी त्यावर खुलासा केला. आपण पद्म पुरस्कारांसाठी कोणच्याही नावाची शिफारस केलेली नाही. पुरस्कारांसाठीच्या समितीकडूनच माझ्याकडे नावे सुचविण्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यानंतरच आपण नावे सुचविली, असे लतादीदींनी म्हटले आहे.
लता मंगेशकर यांनी पद्म पुरस्कारांसाठी आपली लहान बहीण उषा मंगेशकर आणि गायक सुरेश वाडकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याबद्दल लतादीदी म्हणाल्या, दरवर्षी पुरस्कारांच्या समितीचे पत्र माझ्याकडे येते, यात मला पुरस्कारासाठी नावे सुचविण्यास सांगितले जाते. मी आतापर्यंत अनेकांची नावे सुचविली आहेत. यंदाच्या पुरस्कारांसाठी उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचे नाव सुचविले. कारण पद्म पुरस्कारांसाठी ते योग्य आहेत, असे मला वाटते. उषा मंगेशकर ५० वर्षांपासून गायन क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी आसामी, गुजराथी, हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये गायन केले आहे. तसेच त्यांची गाणी चांगलीच प्रसिद्ध आहेत. सुरेश वाडकर हेदेखील मागील ४० वर्षांपासून गायनाच्या क्षेत्रात आहेत. वाडकर यांचे संगीत विद्यालय अमेरिकेसारख्या देशातही आहे. जर मी अशा सर्वगुणसंपन्न गायकांची नावे सूचवत असेन, शिफारस करत असेन, तर यात गैर काय? असा प्रश्न लतादीदींनी केला. यापुढे समितीने विनंती केली तरी मी कुणाचाही नावे सूचवणार नाही, असेही लतादीदी यांनी स्पष्ट केले.