क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विश्वचषक सामन्यातील अंतिम सामना खेळवला जात आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान हा मुकाबला सुरु आहे. हा मुकाबला पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या संघाला अक्षय कुमार पाठिंबा देत आहे.

यावेळी सौरव गांगुली व हरभजन सिंग यांच्यासोबत अक्षय कुमारने गप्पा मारल्या. २०११च्या विश्वचषक सामन्यातील एक आठवण अक्षयने सांगितली. ‘२०११च्या विश्वचषक सामन्यात एम.एस. धोनीने मारलेला षटकार मला अजूनही आठवतोय. त्याने मारलेला बॉल तिथं स्टँडमध्ये बसलेल्या माझ्या एका मित्राने झेलला होता. मित्राने मला तो बॉलसुद्धा दाखवला होता आणि माझ्यासाठी ती एक खास आठवण होती,’ असं तो म्हणाला.

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शोमध्ये स्वागत,’ नवज्योत सिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शाळेत असताना मला नेहमी यष्टीरक्षणासाठी निवडलं जायचं असंही त्याने सांगितलं. त्याचसोबत मुलापेक्षा माझ्या मुलीला क्रिकेटचं फार प्रिय आहे. माझी मुलगी फक्त सहा वर्षांची आहे पण तिला क्रिकेट फार आवडतं. माझ्या मुलाला क्रिकेट आवडत नाही,’ असं तो म्हणाला.

क्रिकेटर रोहित शर्माच्या जीवनावर आधारित जर बायोपिकची निर्मिती झाली तर त्याचं नाव काय असावं असा प्रश्न अक्षयला यावेळी विचारण्यात आला. त्यावर अक्षयने ‘अब की बार दो सौ के पार’ असं मजेशीर उत्तर दिलं. अक्षयने यावेळी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी कौशल्याचंही कौतुक केलं.