28 February 2021

News Flash

खेळापलीकडचा चरित्रपट!

ऑलिम्पिकसाठी पात्र  ठरलेल्या स्केट चॅम्पियनने आपल्या क्षेत्रात विश्वविक्रम केला होता.

‘आइस स्केटिंग’मधील करामतींचा खेळ आपल्या देशापुरता तरी ऑलिम्पिकदरम्यानचा नेत्रदीपक सोहळा असतो. त्यामुळे त्यामधील प्रकाशझोतात वावरणाऱ्या तारांकित व्यक्तींची आपल्याला कल्पना नसते. शिवाय या खेळातील वादग्रस्त तारांकित व्यक्तीचा इतिहास ज्ञात करून घेण्याची उसंत काढण्यास जाणे म्हणजे अंमळ अतिच ठरू शकते. तरीही यंदाच्या ऑस्करपरिघातील एक दावेदार असलेल्या ‘आय, टोन्या’ या चित्रपटाद्वारे या खेळाची माहितीच नव्हे तर दोन-तीन दशके या खेळातील परमोच्च शिखरावर असलेल्या एका वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाभोवतीचे मुरलेले वलय समोर येते. ‘बायोपिक’ किंवा चरित्रपटाच्या रूढ फाटय़ांना टाळत हा टोन्या हार्डिग नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूचा आत्मचरित्रपट बनला आहे. यात तीस वर्षांपूवी तिच्याबाबत घडलेल्या दुर्घटनेला केंद्रभागी ठेवून या व्यक्तिमत्त्वाची बाजू मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. तो या व्यक्तिमत्त्वाविषयी रूढ मार्गाने जात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर आजतागायत दडलेल्या सत्याचा आपल्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

टोन्या हार्डिग या ऑलिम्पिकसाठी पात्र  ठरलेल्या स्केट चॅम्पियनने आपल्या क्षेत्रात विश्वविक्रम केला होता. जगात कुणीही न करू शकलेले स्केटिंगचे कसब, त्यातील नृत्य आणि उडय़ांची कारागिरी तिने मेहनतीने अंगी बाणवली होती. १९९४ साली स्पर्धेच्या आधी तिच्या प्रतिस्पध्र्यावर हल्ला झाला. हल्लेखोर पकडला गेला आणि तो बनाव तिच्या घटस्फोटित पतीने केल्याचे उघड झाले. त्यानंतरच्या चौकशीत टोन्या हार्डिगवर या हल्ल्याच्या सहभागाचा संशय घेतला गेला. ऐन बहरात तिच्यावर खेळासाठी आजीवन बंदी आणली गेली. तिची बाजू ऐकून न घेता माध्यमांपासून ते समाजाने तिच्या कारकिर्दीवर वरवंटा फिरविला. टोन्याला त्यामुळे अनेक वर्षे आत्मअज्ञातवास पत्करावा लागला. गेली दोन-अडीच दशके तिचा प्रतिस्पध्र्यावरील हल्ल्यात सहभाग होता की नाही, याचे कोडे उलगडले गेले नसतानाही तिचे नाव टीकेचे आणि खिल्ली उडविणाऱ्या विनोदकारांचे कुरण बनले. दिग्दर्शक क्रेग गिलिस्पी यांनी टोन्या हार्डिगच्या आयुष्याची क्रमवारी या घटनेनंतरच्या पुढील काही वर्षांपर्यंत नेली आहे. टीकाकार आणि तिच्याविषयीच्या अपसमजांना हा चित्रपट पुरता दूर करतो. पण ट्रॅजिकॉमेडीच्या अंगाने चालणारी त्याची वाट विलक्षण अनुभव देणारी ठरते. क्रीडा विषय असूनही त्यात क्रीडातिरेक होत नाही.

चित्रपटाची  सुरुवात माहितीपट शैलीत झाली आहे. ज्यात टोन्याची आई लव्होना (अ‍ॅलिसन जेनी) तिचा घटस्फोटित पती जेफ गलोली (सबॅस्टिअन स्टॅन), तिचा स्वयंघोषित अंगरक्षक आणि पत्रकार टोन्याविषयीच्या माहितीची आपली पोतडी रिकामी करताना दिसतात. (गरजेनुसार अधूनमधून हे पोतडी ओतण्याचे काम सुरू राहतेच.) मग थेट साडेतीन-चार वर्षांची टोन्या आपल्या आईसोबत स्केटिंग शिकण्यासाठी दाखल होताना दिसते. शिक्षिका तिच्या लहान वयाकडे पाहून तिला प्रवेश नाकारते, तेव्हा आई तिला आपल्या कसबाचे प्रदर्शन करायची आज्ञा देते. तिचे स्वयंप्रेरणेतून साकारलेले कौशल्य पाहिल्यानंतर अर्थातच तिचे प्रशिक्षण पुढल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले दिसते. मग वयाच्या पंधराव्या-विसाव्या वर्षांतील स्केटक्वीन बनलेली टोन्या (मार्गो रॉबी) पाहायला मिळते. रांगडय़ा आणि शिस्तभोक्त आईकडून प्रेम-भावनाशून्य वातावरणात विकसित होणारी टोन्याची स्केटिंगमधील कारकीर्द, तिचे पहिले प्रेम, लग्न, सहजीवनातील आंतर्विरोध आणि खेळातले विश्वविक्रम यांच्याभोवती चित्रपटाचा अर्धा भाग फिरतो आणि मग त्या वादग्रस्त घटनेवर आणून पोहोचवतो. मार्गो रॉबीने प्रचंड ताकदीने ही भूमिका उभी केली आहे. दरेक प्रसंगांदरम्यान ठोसा लगावणाऱ्या तिच्या संवादातील धार, प्रेमप्रकरणातील-लग्नातील स्त्रीसुलभ भावुकता आणि खेळादरम्यानचा नेत्रदीपक नृत्यसोहळा हरखून  टाकणारा आहे. टोन्याची आई वठविणारी अ‍ॅलिसन जेनीची करडी व्यक्तिरेखाही जरब निर्माण करणारी आहे. चित्रपटामधला संगीतासह धावता कॅमेरा त्यातल्या कित्येक प्रसंगांना संस्मरणीय करणारा आहे. टोन्याचा घटस्फोट झाल्यानंतर नवऱ्यापासून लांब जाणारा कॅमेरा, त्यांच्यातील जीवघेण्या हाणामारीच्या प्रसंगांतील गंभीर विनोद आणि टोन्याचे त्यावरचे तगडे भाष्य चित्रपटाला लक्षवेधी बनवते.

टोन्या आपल्या प्रतिस्पध्र्याच्या हल्ल्यामध्ये समाविष्ट होती का, याविषयी कोणतेही ठाम विधान न करता, तिची कारकीर्द आणि खेळातील अव्वल स्थान संपवून टाकणाऱ्या अनेक घटकांना दाखवून चित्रपट स्पष्टवक्ता ठरतो. खेळापलीकडे माणूस म्हणून टोन्याची भलामण न करता तिच्यावर लागलेला कलंक पुसण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. यातील सर्व घटक अस्तित्वात असल्याने चित्रपट प्रदर्शनानंतर गेल्या काही महिन्यांत नवनवे वाद सुरू झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर ऑस्करमध्ये त्याचे स्थान काय असेल, याचे कुतूहल मोठे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 1:39 am

Web Title: i tonya review robbie and janney shine in crazy true story
Next Stories
1 ‘पुष्पावल्ली’च्या करामती
2 अखेर गुप्तहेर ‘कॉनन’ची केस क्लोज
3 म्हणे.. त्या मृत गायिकेचा आत्मा काळ्या पक्षात                                                 
Just Now!
X