ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आजारी आहेत त्याचा गैरफायदा समीर भोजवानी घेतो आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी लक्ष घालावं अशी विनंती आता अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळही मागितली आहे. सोमवारीच त्यांनी समीर भोजवानींच्या सुटकेनंतर एक ट्विट केला होता ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे मदत मागितली होती. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर हे प्रकरण लवकर निकाली लागेल असेही सायरा बानो यांनी म्हटले आहे. जमीन माफिया समीर भोजवानीची सुटका झाल्यानंतर सायरा बानो यांनी तातडीने ट्विट करत या प्रकरणात पंतप्रधानांनी लक्ष घालावे असे सायरा बानो यांनी म्हटले होते. आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे अशी विनंती त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?
डिसेंबर २०१७ मध्ये सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली होती. वांद्र्यांच्या पाली हिल भागातील दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले तसेच यासंबधी सायरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलं होतं. समीर भोजवानी याने काही खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच तो दिलीप कुमार यांना धमकावत आहे. शिवाय समीरची राजकीय वर्तुळातही फार ओळख असल्याने तो आम्हाला सतत धमकावत असल्याचे सायरा यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर समीर भोजवानीला अटकही झाली होती. त्याची सुटका झाल्यानंतर सायरा बानो यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.