बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना चित्रपट निर्मात्यांकडून सापत्न वागणूक मिळायची हा मुद्दा पटवून देताना बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने तिला सामोरे जावे लागलेल्या प्रसंगाचे कथन केले. ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वूमन इन द फिल्म’ या विषयावरील चर्चासत्रात ती बोलत होती. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्रीने दिलेल्या सल्ल्याचे स्वागत होत नसे. काहीवेळा तर असे सल्ले देण्याचा प्रयत्न केल्याने अपशब्द देखील ऐकावे लागले आहेत. मात्र, अभिनेत्याने सल्ला दिल्यास त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जायचे, असे कंगना यावेळी म्हणाली.

एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी माझ्या चित्रपटासाठीचे डायलॉग्स, स्क्रिन प्ले आणि इतर काही गोष्टी सूचवण्याचा प्रयत्न सुरू केला, पण माझ्या सल्ल्यांपेक्षा चित्रपटातील अभिनेत्याने दिलेले सल्ले सकारात्मक पद्धतीने घेतले जायचे. अभिनेत्रीने दिलेल्या सल्ल्याला काहीच महत्त्व नव्हते. एकदा तर सल्ला दिल्याबद्दल अपशब्द देखील मी ऐकले आहेत, असे कंगनाने सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना सध्या दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक शेखर कपूरने त्याच्या आगामी चित्रपटासाठी ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या भूमिकेसाठीही कंगनाला विचारणा केली आहे.