‘तरुण तेजांकित’ पुरस्कारविजेते निर्माते राहुल भंडारे यांचे मनोगत

‘गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’तर्फे देण्यात येणारा पहिला ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ मिळण्याआधी मी नाटय़-व्यवसायातील सततच्या अपयशामुळे आणि त्यापायी झालेल्या प्रचंड कर्जामुळे नाटय़निर्मिती थांबवून पोटापाण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसायाकडे वळायच्या निर्णयाप्रत आलेलो होतो. परंतु ‘लोकसत्ता’चा हा पुरस्कार मिळाला आणि माझ्या जिद्दीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि मी नाटय़-व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार सोडून दिला,’ अशी कबुली नाटय़निर्माते राहुल भंडारे यांनी दिली.

‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्काराने मला नवसंजीवनी दिली आणि त्यानंतर ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाची मी निर्मिती केली. या नाटकाने मला यशाची चव पुन्हा चाखविली आणि आज मी कर्जाच्या बोझ्यातून हळूहळू बाहेर येत आहे, असे ते म्हणाले.

नाटय़-व्यवसायाची कसलीही पार्श्वभूमी नसताना ऐन तरुण वयात या व्यवसायात निर्माते म्हणून उतरणारे राहुल भंडारे हे मानवाधिकार कायद्याचे स्नातक आहेत. सहसा कलाकार म्हणूनच रंगभूमीवर करीअर करण्याची स्वप्ने बहुतेक तरुण पाहत असताना राहुल भंडारे यांनी मात्र नाटय़निर्माता व्हायची आकांक्षा धरली. नाटय़-व्यवसायाचा कसलाच अनुभव गाठीशी नसताना भरपूर टक्केटोणपे खाऊनही अर्थपूर्ण आणि चाकोरीपासून हटके नाटकांची निर्मिती करण्याची आस बाळगून ते नाटय़सृष्टीत आले. गेल्या १३-१४ वर्षांत त्यांनी ‘ठष्ट’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘बॉम्बे- १७’, ‘टॉम आणि जेरी’, ‘अडगळ’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘प्यार किया तो डरना क्या’ यांसारख्या विभिन्न जातकुळीच्या नाटकांची निर्मिती केली. गेल्या तीन-चार वर्षांत त्यांच्या या चाकोरीबाहेरच्या नाटकांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ते पुरते निराश झाले होते. नाटकांसाठी काढलेल्या कर्जाचा बोजाही एकीकडे वाढत चालला होता. त्यामुळे याउप्पर आपल्याला आपल्या मनोजोग्या नाटकांची निर्मिती करता येणार नाही, तेव्हा नाटय़निर्मिती थांबवून दुसरे काहीतरी करावे, या निर्णयाप्रत ते आले होते. ‘कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आत्महत्येच्या निर्णयाप्रत येणाऱ्या शेतकऱ्यागत माझी अवस्था झाली होती. परंतु ‘तरुण तेजांकित पुरस्कारा’ने मला नवी उमेद दिली, माझ्या मनावरचे निराशेचे मळभ दूर केले आणि मी पुन्हा एकदा नव्या जोमाने नाटय़निर्मितीकडे वळलो,’ असे राहुल भंडारे यांनी सांगितले. ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाच्या प्रचंड यशाने माझा उत्साह दुणावला आहे. आशयघन, वेगळ्या पठडीची नाटके सादर करण्याची माझी मूळची ऊर्मी मला आता स्वस्थ बसू देत नाहीए. म्हणूनच मी ‘आरण्यक’ची निर्मिती केली. याकामी झी मराठीची साथही मोलाची ठरली. मात्र, आता व्यवसायातले टक्केटोणपे खाऊन मी अनेक गोष्टी शिकलो आहे. व्यवसायाची गणिते मला कळू लागली आहेत. त्यामुळे या व्यवसायावर पक्की मांड ठोकण्याची क्षमता आपल्यात निर्माण करायचा चंग मी बांधला आहे. या सगळ्यात ‘लोकसत्ता’चे मोठे ऋण मी मानतो. ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ त्यावेळी न मिळता तर मी आज नाटय़सृष्टीत असतो की नाही हे मला सांगता येत नाही,’ अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.