बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. अभिनेता ड्वेन जॉन्सन आणि झॅक एफ्रॉन यांच्यासोबत ‘बेवॉच’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकेल. ‘व्हिक्टोरिया लीड्स’ या खलनायिकेची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. प्रियांकाने स्वबळावर चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. आता यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीला एकेकाळी बॉलिवूडमध्ये नकाराला सामोरे जावे लागले होते.

सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या प्रियांका चोप्राने ‘मिड-डे’ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कशाप्रकारे तिला बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये नाकारले जात होते याचा खुलासा केला. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग यासारखे बरेचसे सुपरस्टार इंडस्ट्रीमध्ये आउटसाइडर्स आहेत. असे असताना घराणेशाहीच्या वादामध्ये तू कोणाच्या बाजूला आहेस असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला. त्यावर प्रियांका म्हणाली की, इंडस्ट्रीत वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. एखाद्या मोठ्या स्टारच्या घरात जन्म घेणे यात काहीही चुकीचं नाही. बाहेरुन आलेल्या कलाकारांना इंडस्ट्रीत सहज एण्ट्री मिळत नाही. तसेच, स्टार किड्सवर त्यांच्या घराण्याचे नाव राखण्याचा दबाव असतो. प्रत्येक कलाकाराचा एक प्रवास असतो. माझ्या प्रवासाबद्दल म्हणाल तर मी बरंच काही सहन केलं आहे. कारकीर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये निर्मात्यांकडे दुसऱ्या अभिनेत्रीची शिफारस करण्यात आल्यामुळे चित्रपटातून माझी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी मी खूप रडले होते. पण, शेवटी ज्यांच्यांवर यशोगाथा बनायच्या त्या बनतातच.

प्रियांकाचा बॉलिवूडमधला प्रवास सोपा नव्हता. पण, ही अभिनेत्री कधीच मागे हटली नाही. अपमान, अपयश या सगळ्याला आपल्या कामाने तिने चोख उत्तर दिले आहे. अमेरिकी टेलिव्हिजन सीरिज ‘क्वांटिको’मध्ये काम करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री बनली. येत्या २ जूनला ती ‘बेवॉच’ चित्रपटातून हॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे.

सगळ्यात आधी कंगना रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये कंगनाने करणचा उल्लेख ‘मूव्ही माफिया’ असा केला होता. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच कलाकारांनी घराणेशाहीवर आपापली मतं मांडली. काहींनी ‘क्वीन’ कंगनाला पाठिंबा दिला. तर आलिया भट्ट आणि इतर काही कलाकारांनी स्टार किड असल्याने काहीच फरक पडत नाही असे म्हणत दिवसाखेर तुमचे काम महत्त्वाचे असते असे म्हटले होते