कलाविश्वात लिंक अप आणि ब्रेक अपच्या चर्चा काही नवीन नाहीत. अभिनेत्री मौनी रॉय आणि मोहित रैना लग्नबंधनात अडकण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. अखेर मौनीसोबतच्या नात्यावर मोहित व्यक्त झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘महादेव’ फेम मोहितने त्याच्या लग्नाविषयीचे प्लॅन्स सांगितले.

मोहित आणि मौनी यांनी ‘देवों के देव..महादेव’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र आमच्यात असं काहीच नव्हतं म्हणत मोहितने या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. ‘या वर्षी मी लग्नबंधनात अडकण्याचा विचार करत आहे. पण मी इथे मौनीचं नाव घेत नाहीये. ती माझी सहकलाकार होती आणि सध्या तिचं करिअर उत्तम सुरू आहे. मी तिला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. पण मी तिच्यासोबत कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो,’ असं तो म्हणाला.

‘महादेव’ मालिका सुरू असतानाच मौनीला बॉलिवूडचे तिकिट मिळाले. ती अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटात झळकली. तर मोहितनेसुद्धा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात भूमिका साकारली.