बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलीवूडमधील एका व्यक्तीकडून तिचा शारीरिक छळ झाला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पत्रकार बरखा दत्त यांच्या ‘धिस अनक्वाएट लॅण्ड’ या पुस्तकाच्या गुरूवारी झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात कंगनाने याबद्दल सांगितले. बॉलीवूडमध्ये सुरूवातीच्या दिवसांत तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचे कंगनाने यावेळी सांगितले. तो खूप कठीण काळ होता. माझा शारीरिक छळ झाला होता. मात्र, आता मला त्याप्रकरणाच्या खोलात जायचे नसल्याचे कंगनाने म्हटले. यावेळी बरखा दत्त यांनी ती व्यक्ती बॉलीवूड इंडस्ट्रीतीलच होती का, असे विचारले असता कंगनाने होकारार्थी उत्तर दिले. बॉलीवूड इंडस्ट्रीत मार्गदर्शक आणि गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. मी १७ वर्षांची असताना ती व्यक्ती माझा पाठलाग करत होती. त्याने माझ्या डोक्यात जोराचा फटका मारल्यामुळे माझ्या डोक्यातून रक्त आले होते. त्यावेळी मीदेखील माझी सँडल काढून त्याच्या डोक्यात जोरात मारली, तेव्हा त्याच्याही डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, त्याला पोलिसांनी समज देऊन सोडून दिल्याचे कंगनाने यावेळी सांगितले. त्यावेळी मला सापळ्यात अडकल्यासारखे झाले होते. एखादी व्यक्ती तुमची मदत करत आहे, असे तुम्हाला वाटते. मात्र, याठिकाणी काहीही फुकट नसते. या क्षेत्रात तुम्हाला अशाप्रकारच्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, असे तिने सांगितले.