बॉलिवूडमधील ९०च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीनाने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण बॉलिवूडमधील तिचा हा प्रवास सोपा नव्हता. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

रवीना टंडन ही तिच्या भूमिकांसोबतच बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती सामाजिक विषयांवर देखील तिचे मत मांडताना दिसते. नुकताच तिने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्री आणि अभिनेते यांच्याशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते असे देखील सांगितले आहे. पूर्वी हिरो, त्याची गर्लफ्रेंड आणि पत्रकार यांचे ग्रूप असायचे असे तिने सांगितले.

‘मला आश्चर्य वाटते आज महिला पत्रकार ज्या स्वत:ला स्त्रीवादी असल्याचे म्हणतात आणि या विषयावर अनेक लेख लिहितात. त्यांनीच त्यावेळी मला पाठींबा दिला नव्हता. कारण त्यावेळी हिरोने त्यांना त्यांच्या पुढच्या कवर पेज स्टोरीसाठी आश्वासन दिले होते. मी माझ्या प्रामाणिकपणामुळे नाही तर माझ्याबद्दल लिहिण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे अनेक चित्रपट गमावले’ असे रवीना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘माझ्याकडे कोणी गॉडफादर नव्हता. मी कोणत्या ग्रूपचा हिस्सा देखील झाले नव्हते, मी चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी कोणत्या अभिनेत्यासोबतच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. तसेच माझे कोणासोबत अफेअर देखील नव्हते. अनेकदा अभिनेते माझ्याकडून अपेक्षा करत असलेल्या गोष्टी मी केल्या नाहीत. जसं की त्यांनी उठ म्हटले की उठणार, बसं म्हटले की बसणार. त्यामुळे मी गर्विष्ठ असल्याचे म्हटले गेले. मला माझे आयुष्य माझ्या अटींवर जगायचे होते.’