‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि ‘गली बॉय’ या चित्रपटाला तब्बल १३ फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आले. इतर चित्रपट आणि कलाकार यापेक्षा अधिक पात्र असतानाही त्यांना पुरस्कार का दिले नाही, असा संताप चित्रपटप्रेमी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अनेकांनी या पुरस्कार सोहळ्यावरच बंदी आणण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर यापुढे पुरस्कार सोहळ्याला जाणार नाही, अशी शपथ काही कलाकारांनी घेतली आहे. फिल्मफेअर पुरस्कारविरोधात चर्चा सुरु असताना सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने फिल्मफेअर पुरस्कारावर जोरदार टीका केली आहे.

“मला असं वाटतं की ज्यांना आत्मविश्वास नसतो त्यांना पुरस्कार हवाहवासा वाटतो. फिल्मफेअर किंवा दुसऱ्या कोणताही मूर्खासारख्या पुरस्कार सोहळ्यात मी जाणार नाही. राष्ट्रीय पुरस्कार असेल तर मी नक्की जाईन. कारण तो मिळणे हा सन्मान असतो,” अशा शब्दांत सलमानने फिल्मफेअर तसंच इतर कलाकारांना टोमणा मारला.

आणखी वाचा : सरसंघचालकांचं वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर

यापुढे तो म्हणतो, “आमच्या मुलाखती छापून जे मासिक चालतं, ते आम्हाला बोलावणार आणि पुरस्कार देणार. हे मूर्खपणाचं आहे. तिथे जायचं आणि परफॉर्म करायचं आणि त्यावर तेच पैसे कमावणार. उद्या माझा ड्राइव्हर, स्पॉटबॉय किंवा मेकअपमॅन मला म्हणेल, की बाबा आज तुला मी अवॉर्ड देणार. हा खरंच मूर्खपणा आहे.”

‘गली बॉय’ला मिळालेले १३ पुरस्कार हे आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांच्या संख्येपेक्षा सर्वाधिक आहे. अभिनेत्री अनन्या पांडेला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. अभिनय येत नसतानाही तिला पुरस्कार देणं कितपत योग्य आहे, असा सवाल यावरून नेटकऱ्यांनी उपस्थित केला.