बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन ही ‘एक अलबेला’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. भगवान दादांवर आधारित असलेल्या या चित्रपटात विद्याने अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारली आहे.
नुकताचं या चित्रपटातील शोला जो भडके हे गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी विद्याला सर्वांनी मराठीत बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा विद्या म्हणाली की, मला मराठी येतं, पण मी मराठीत बोलणार नाही. कारण मी जर मराठीत बोलले तर इतर अभिनेत्रींना असुरक्षित वाटेल. त्यानंतर विद्याने स्मितहास्य केले. पुढे ती म्हणाली की, मी मुंबईचीच मुलगी आहे. मुंबईमध्येच मी लहानाची मोठी झाले. सातवीपर्यंत मला शंभर गुणांचे मराठी होते. मला ब-यापैकी मराठी बोलता येते. माझे अनेक नातेवाईक महाराष्ट्रीयन आहेत. माझा कर्मचारी वर्गदेखील मराठी आहे. मला मराठी कधीच परके वाटले नाही. मी मराठी चित्रपट देखील बघते. कट्टयार काळजात घुसली चित्रपट मी पाहिलाय. त्याचे चित्रीकरण, गाणी मला फारचं आवडली. मला अधूनमधून मराठी चित्रपटाबाबत विचारणा होते. पण त्यासाठी मला माझे मराठी अधिक सुधारण्याची गरज आहे. मराठी चित्रपटांसाठी मी कोणालाचं माझा आवाज डब करू देणार नाही. माझे डबिंग मीच करणार.
‘एक अलबेला’ या चित्रपटात मंगेश देसाईने भगवान दादा यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या २४ जूनला प्रदर्शित होणार आहे.